आयुक्त तुकाराम मुंढेंचे नाही म्हणजे नाहीच... वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जून 2020

पालिकेच्या स्थायी समितीला यंदाचा अर्थसंकल्प सादर करायचा आहे. त्याकरिता प्रफुल्ल फरकसे यांना 10 दिवसांसाठी स्थायी समितीकडे वर्ग करावे, अशी विनंती महापौर जोशी यांनी पत्राद्वारे आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी मंगळवारी ही विनंती फेटाळून लावली.

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला आठमुठेपणा कायम राखत अर्थसंकल्प तयार करण्यासाठी महापौर यांनी केलेली कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल फरकसे यांची दहा दिवस सेवा देण्याची विनंतीसुद्धा फेटाळून लावली आहे. 

पालिकेच्या स्थायी समितीला अर्थसंकल्प तयार करण्यासाठी दरवर्षी कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल फरकसे सहकार्य करीत होते. मात्र, मुंढे यांनी धंतोली झोनमध्ये त्यांची बदली केली आहे. पालिकेच्या स्थायी समितीला यंदाचा अर्थसंकल्प सादर करायचा आहे. त्याकरिता प्रफुल्ल फरकसे यांना 10 दिवसांसाठी स्थायी समितीकडे वर्ग करावे, अशी विनंती महापौर जोशी यांनी पत्राद्वारे आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी मंगळवारी ही विनंती फेटाळून लावली. फरकसे हे कनिष्ठ अभियंता आहेत. त्यांचा आणि अर्थसंकल्प तयार करण्याचा संबंध नाही. त्यामुळे त्यांना स्थायी समितीकडे वर्ग करणे उचित ठरणार नाही, असे उलट टपाली आयुक्तांनी कळविले आहे. 

मागील 12 वर्षांपासून फरकसे हे स्थायी समितीचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. अर्थसंकल्प तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, मुंढे यांनी कुठलेच कारण न देता, महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष कोणाशीच चर्चा न करता त्यांची बदली केली. पालिकेच्या कायद्यानुसार आयुक्तांच्या सुट्या मंजूर करणे, नाकारणे स्थायी समितीच्या अंतर्गत येते.

हेही वाचा : बनावट विक्रीपत्र तयार करून हडपले घर

कायद्यानुसार, आयुक्तांपेक्षा स्थायी समितीच्या अध्यक्षांची जबाबदारी मोठी आहे. असे असताना कोणाच्या तरी सांगण्यावरून फरकसे यांची बदली करण्यात आल्याचे महापौरांनी आपल्या पत्रात म्हटले होते. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी फरकसे यांची मदत लागत असेल आणि 10 दिवसांची सेवा हवी असेल, तर त्यात काही वावगे नाही. फरकसे यांनी मोठे पाप वा गुन्हा केला, असेही नाही. त्यासाठी एवढा आठमुठेपणा कशासाठी, असा सवालही जोशी यांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner Tukaram Mundhe rejected the request