ऊर्जामंत्र्यांचा मोठा निर्णय, घरगुती वीज ग्राहकांना मिळणार हा दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

जून महिन्यात घरगुती ग्राहकांना आलेले वीजबिल भरण्याची पद्धत निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना तीन हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सवलत मिळेल.

नागपूर : भरमसाठ वीजबिल आल्याने चिंतित असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. ग्राहकांना तीन हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सवलत देण्याची तसेच एकरकमी बिल भरणाऱ्यांना 2 टक्के सूट देण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केली. 

जून महिन्यात घरगुती ग्राहकांना आलेले वीजबिल भरण्याची पद्धत निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना तीन हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सवलत मिळेल. हप्ते पाडण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. कुठल्याही वीजबिल भरणा केंद्रावर जाऊन कमीत कमी वीजबिलाच्या एकतृतीयांश रक्कम भरता येईल. संपूर्ण वीजबिल एकाचवेळी भरल्यास 2 टक्‍क्‍यांची सूट मिळेल. यापूर्वीच संपूर्ण रकमेचे बिल भरणाऱ्या ग्राहकांनासुद्धा ही सूट मिळणार आहे. 

अधिक माहितीसाठी - Video : फार्महाऊसवर सहा जणांनी पतीसमोर केला पत्नीवर बलात्कार
 

लॉकडाऊनच्या काळात गावी गेल्याल्यांचे मीटर रीडिंग घेता आले नाही. अशा ग्राहकांनाही प्रत्यक्ष रीडिंग घेऊन, बिल दुरुस्त करून देण्यात येतील. बिलासंदर्भातील माहिती ग्राहकांना समजावून देण्यासह तक्रारींचे निवारण करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयात ग्राहक मदत कक्ष स्थापन करण्यात येतील. 

ग्राहकांशी वेबिनार आणि फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला जाईल. आठवडा बाजार व रहिवासी सोसायटीमध्ये मेळावे घेण्यात येतील. मीटर रीडर व बिलवाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ग्राहकांसोबत संवाद साधला जाईल. एसएमएस, पोस्टर्सद्वारे वीज आकारणीबद्दल सुलभ माहिती दिली जाईल. वरील सर्व उपाययोजनांचा वापर करून देखील ग्राहकांचे समाधान न झाल्यास ईमेल आयडी energyminister@mahadiscom.in व मोबईल क्रमांक 9833567777 व 9833717777 वरून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नितीन राऊत यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Concession for household electricity customers, pay electricity bills in three installments