कानात आवाज येतोय, तोलही जातोय ! सावधान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

दुर्बिणीद्वारे कान- नाक- घशातील दुर्धर आजारांवरील जटिल शल्यक्रिया सहज शक्‍य आहे. डोक्‍याच्या कवटीत हा भाग सुरक्षित असतो. मात्र कानातील ऐकण्याच्या 8 व्या क्रमांकाच्या शीरेतील अर्थात ब्रेन स्टेम, लहान मेंदूजवळ ट्युमर तयार झाल्यानंतर ऐकायला कमी येते.

नागपूर : कानात आवाज येणे, बरोबरीने तोल जाणे ही समस्या नक्की कानाची समजावी की मेंदूची असा मनात घोळ निर्माण होतो. मात्र सामान्य व्यक्ती सारेच फिजिशियनकडे जातात. ही समस्या कानाची तसेच मेंदूची आहे. यामुळे कानाच्या कवटीच्या पायथ्याशी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेत कान, नाक, घसा रोग तज्ज्ञ तसेच मेंदूरोग तज्ज्ञ यांच्या समन्वयातून करण्यात यावी. यामुळे अपंगत्वाची जोखीम कमी होते, असे मत कान- नाक- घशा तज्ज्ञ डॉ. संदीप करमरकर यांनी आज येथे व्यक्त केले.

सविस्तर वाचा - अपमान जिव्हारी लागल्याने भाजप कार्यकर्त्याने केले असे...

असोसिएशन ऑफ ऑटोलिरिंगॉलॉजिस्ट ऑफ इंडियातर्फे कान- नाक- घशारोग तज्ज्ञांची परिषद उपराजधानीतील चिटणवीस सेंटर येथे सुरू आहे. या परिषदेसाठी नागपूरात आले असता, डॉ. करमरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, दुर्बिणीद्वारे कान- नाक- घशातील दुर्धर आजारांवरील जटिल शल्यक्रिया सहज शक्‍य आहे. डोक्‍याच्या कवटीत हा भाग सुरक्षित असतो. मात्र कानातील ऐकण्याच्या 8 व्या क्रमांकाच्या शीरेतील अर्थात ब्रेन स्टेम, लहान मेंदूजवळ ट्युमर तयार झाल्यानंतर ऐकायला कमी येते. कानात ऐकण्याचा आणि शरीराचा तोल सांभाळण्याचा अशी लक्षणे दिसून आली की, अशा ट्यूमरवरील शस्त्रक्रिया कान नाक घसा रोग तज्ज्ञ आणि मेंदूरोग तज्ज्ञ यांच्या समन्वयातून व्हावी. या शस्त्रक्रियेत 5 ते 12 नंबरच्या शिरांना धोका असल्याचेही ते म्हणाले.

अंतर्कणात निर्माण झालेली समस्येवर एमआरआय करण्याचा सल्ला डॉक्‍टरांकडून दिला जात नाही. एमआरआय करण्याचा सल्ला दिला तर त्वरीत निदान होईल. पुर्वी कवटीत होणाऱ्या शस्त्रक्रिया या साऱ्यांसाठी मेंदूरोग तज्ज्ञ कवटीतून दुर्बिण टाकून करीत होते. मात्र या कवटीचे दरवाचे कान आणि नाकातून जातात, यामुळे प्रगत वैद्यकीय तंत्रामुळे कान-नाकाद्वारे दूर्बिणीद्वारे शल्यक्रिया शक्‍य झाली आहे. शिवाय जोखिमही कमी होऊन उपचारात अचुकता आणि जोखमीवर मात करणे शक्‍य झाले असल्याचे डॉ. करमरकर म्हणाले.

रोबोटीक सर्जरी ठरतेय वरदान : डॉ. पावडे
हल्ली कान- नाक- घसा रोग तज्ज्ञांच्या मदतीसाठी रोबोटीक सर्जरीचा विकल्प उपलब्ध झाला असून ही सर्जरीमध्ये रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. चिरा न देता सुक्ष्म छिद्राद्वारे ट्युमर काढण्यासोबतच शस्त्रक्रिया अचूक होते. विशेष असे की, चुकीच्या ठिकाणी चिरा पडत नसल्याने रक्तस्त्राव कमी होतो. परदेशात ही पद्धत वापरली जात असली तरी महागडी असल्याने देशात फार कमी ठिकाणी वापर होत असल्याचे जेष्ठ काननाक घसा रोग तज्ज्ञ डॉ. अपूर्व पावडे म्हणाले.

डॉक्‍टरांमध्ये असावा समन्वय : डॉ. कापरे
लवकर निदानानंतर अचूक उपचारासाठी अलिकडे पॅथालॉजी, रेडिओलॉजी तसेच उपचारासमयीचे तज्ज्ञ असतात. यांच्यात समन्वय असला की, रुग्णावर उपचार सोयीचे ठरतात. सर्वांनी रुग्णांपुढेच शस्त्रक्रियेबाबत चर्चा करून निर्णय घेतल्यास पारदर्शता टिकून राहाते. यातून डॉक्‍टरांवरील आक्षेप दूर होण्यास मदत होईल, असे मत जेष्ठ कान नाक घसा रोग तज्ज्ञ डॉ. मदन कापरे यांनी व्यक्त केले.

दुर्लक्ष करू नये
कानात आवाज येणे आणि तोल जाण्याकडे दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष झाल्यास ती समस्या वाढत जाते. तोल जाऊन पडल्यास हातापायांना वा डोक्‍याला दुखापत होण्याचीही शक्‍यता असते. मेंदूतला दाब वाढतो. फिट येण्याची भिती आहे. प्रसंगी जीवाला धोका आहे.
डॉ. संदीप करमरकर, रूबी हॉस्पिटल, पूणे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conference of ENT specialist held in Nagpur