नागपूरच्या नगरसेवकांना का म्हणावे लागतेय `तुका` म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. विरोधी पक्षातील नगरसेवक हरीश ग्वालवंशी यांनी 'तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे', असा टोला सत्ताधाऱ्यांना हाणला.

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विकास कामे रोखल्याने सत्ताधारी बाकावरील नगरसेवक चांगलेच चिडले आहेत. आयुक्तांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. विरोधी पक्षातील नगरसेवक हरीश ग्वालवंशी यांनी 'तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे', असा टोला सत्ताधाऱ्यांना हाणला.

आयुक्तांनी विकास कामे रोखल्याने आर्थिक स्थितीचा आढावा ठेवण्याबाबत त्यांना निर्देश देण्यात आले होते. आयुक्तांनी आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आकडेवारीसह आर्थिक स्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी बाकावरील प्रवीण दटके, संजय बंगाले, दयाशंकर तिवारी यांनी आयुक्तांना संपूर्ण 12 वर्षांच्या आकडेवारीसह निवेदन करण्याचा आग्रह धरला. तोपर्यंत कार्यादेश झालेली कामे सुरू करण्याची विनंती सभागृहाला केली.

विकास कामे रोखल्याने सत्ताधारी नगरसेवकांचा संताप बघता विरोधी बाकावरील हरीश ग्वालवंशी यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतले. विकास कामे थांबविल्याचा सत्ताधाऱ्यांना आज त्रास होत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे सत्ताधारी निधी देत नसल्याने हा त्रास विरोधक सहन करत होते. आता सत्ताधाऱ्यांवरच त्रास सहन करण्याची वेळ आली. आता 'तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल, ते ते पहावे', असा टोला त्यांनी हाणला. जोपर्यंत स्वतःवर वेळ येत नाही, तोपर्यंत कळत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. कॉंग्रेसचे कमलेश चौधरी यांनी नवीन नगरसेवक तसेच विरोधी नगरसेवकांना किती निधी दिला, याचाही आयुक्तांनी लेखाजोखा मांडावा, अशी मागणी करीत सत्ताधाऱ्यांच्या दुजाभावावर बोट ठेवले.

अवश्य वाचा - तुकाराम मुंढे यांना विकासकामे रोखणे भोवणार? अविश्‍वास प्रस्तावाचे संकेत!

ऐवजदारांच्या नियुक्तीवर सभेचेही शिक्कामोर्तब
शहराची स्वच्छता करताना अनेक वर्षांपासून सेवा देत असलेल्या ऐवजदारांना स्थायी करण्याची मागणी बसपाचे जितेंद्र घोडेस्वार यांनी प्रश्‍नोत्तरात केली. आस्थापना खर्चाच्या नावावर त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी मागणी कॉंग्रेसच्या हर्षला साबळे, अपक्ष आभा पांडे यांनी केली. महापौर संदीप जोशी यांनी 1800 ऐवजदारांना स्थायी करण्याचा निर्णय झाला असून प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

आणखी वाचा -  दारूबंदी असलेल्या गांधीजींच्या वर्धा जिल्ह्यात महिलेने भर बाजारात का विकली दारू? पोलिसमामाही गोंधळले

सभागृहात 'सकाळ'च्या वृत्ताची चर्चा
ऐवजदारांना स्थायी करण्यास आडेवेढे घेणाऱ्या प्रशासनावर तुटून पडताना आभा पांडे यांनी 'सकाळ'मध्ये 16 फेब्रुवारी रोजी 'अधिकाऱ्यांच्या भाड्याच्या वाहनांवर उधळपट्टी' या प्रकाशित झालेल्या बातमीवरून प्रशासनावर प्रश्‍नाची सरबत्ती केली. अधिकाऱ्यांच्या भाड्याच्या वाहनावर उधळण केली जात असताना ऐवजदारांना स्थायी करण्यावरून खर्चावर का बोलले जाते? असा सवाल उपस्थित केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress corporator make fun of BJP NMC