महापौर संदीप जोशींचा गौप्यस्फोट, म्हणाले आम्हाला 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचे कारस्थान

A conspiracy to trap us in a honey trap : Mayor Sandeep Joshi.
A conspiracy to trap us in a honey trap : Mayor Sandeep Joshi.

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यातील वाद राज्यभर गाजत आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. गंटावार यांच्या निलंबनावरून आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हा वाद आता भलत्याच वळणावर येऊन पोचला आहे. नुकतेच 'व्हायरल' झालेल्या एका ऑडीओ क्‍लीपमध्ये मला आणि ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसविण्याबाबतचे संभाषण असल्याचे महापौर जोशी यांनी आज सांगितले. प्रशासनातील अधिकारी अशा गलिच्छ पद्धतीचे राजकारण करत असतील, तर ते फार भयानक असल्याचेही जोशी यांनी यावेळी नमूद केले.

साहील सैय्यद नामक व्यक्ती त्याच्या माणसाला उपरोक्त विषयासंदर्भात माहिती देत आहे. मी दयाशंकर तिवारी यांना समोर करतो आहे आणि ते प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आरोप करताहेत, असा उल्लेख त्या ऑडीओ क्‍लीपमध्ये आहे. या क्‍लीपमध्ये जे बोलत आहेत, ते साहील सैय्यद पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. गंटावार यांच्यासोबत ऍलेक्‍सिस हॉस्पिटलमध्ये धाड टाकत असतानाची त्यांचीही एक व्हिडीओ क्‍लीप बाहेर आल्याचेही जोशींनी सांगितले.

नागपुरात यापूर्वीही राजकारण होत आलं आहे. पण, प्रशासकीय व्यक्ती अशा प्रकारची कामे करून शहरात गलिच्छ, घाणेरडं वातावरण तयार करण्याचे प्रयत्न करीत असतील तर आमच्यासकट संपूर्ण नागपूरकरांसाठी हा शरमेचा विषय आहे. असं कधी होऊ नये, यासाठी आम्ही सर्व एकत्रितपणे प्रयत्न करीत असतो. पण, प्रशासनातील अधिकारी जर असे करीत असतील, तर ते अत्यंत वाईट आहे. या प्रकाराची तक्रार आम्ही करणार आहोत.

डॉ. गंटावारांना निलंबित करण्याचे आदेश सभागृहात दिले होते. कारण नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी सभागृहात त्यांच्याविरोधातील पुरावे सादर केले होते. त्यानंतरही त्यांना आजपर्यंत वाचविण्यातच येत आहे. या ऑडीओ क्‍लिपमधून जे उघडकीस आले, त्यामागे डॉ. गंटावार प्रकरण कारणीभूत असण्याचीही शक्‍यता आहे.

या कारस्थानामागे आयुक्त आहेत का, असा प्रश्‍न विचारला असता, महापौर म्हणाले की, त्या क्‍लीपमध्ये बरीच नावे घेण्यात आली आहेत. त्यामुळे यामागे नेमकं कोण आहे, हे सांगणं योग्य होणार नाही. आम्ही तक्रार करणार आहोत. पोलिसांच्या कारवाईनंतर सत्य काय ते पुढे येईल. कारण पोलिसांवर आमचा पूर्ण विश्‍वास आहे, असे महापौर जोशी यांनी सांगितले.

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com