चिंब पावसानं … आबादानी ! ४६ मिलिमीटर बरसला, आणखी दोन-तीन दिवस जोरदार

नरेंद्र चोरे
Thursday, 13 August 2020

नागपूरकर साखरझोपेत असताना मध्यरात्री एकच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. दिवसभर सरींवर सरी सुरूच होत्या. थोडा वेळ ब्रेक घेतला की पुन्हा जोरदार सर यायची. जवळपास दिवसभर हा सिलसिला सुरू होता.

नागपूर : मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने आज नागपूरकरांना ना. धों. महानोर यांच्या 'चिंब पावसानं रानं झालं आबादानी' या कवितेची आठवण करून दिली. वरूणराजाने अधूनमधून ब्रेक घेत दिवसभर हजेरी लावून अख्खे शहर ओलेचिंब केले. पावसामुळे जागोजागी पाणी साचले. त्यामुळे दैनंदिन जीवनही प्रभावित झाले आहे. शहरात आज सायंकाळी साडेपाचपर्यंत ४६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात आणखी दोन-तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मॉन्सून सध्या विदर्भात सक्रीय आहे. नागपूरकर साखरझोपेत असताना मध्यरात्री एकच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. दिवसभर सरींवर सरी सुरूच होत्या. थोडा वेळ ब्रेक घेतला की पुन्हा जोरदार सर यायची. जवळपास दिवसभर हा सिलसिला सुरू होता. पावसामुळे नागपूरकरांना रेनकोट व छत्र्या घेऊन फिरावे लागले. तर पावसाच्या माऱ्यामुळे काहींना आडोशाचा आधार घ्यावा लागला.

मोठी बातमी :  खासदार नवनीत राणा अस्वस्थच, पुढील उपचारांसाठी मुंबईला हलवले

संततधार पावसामुळे , अनेक ठिकाणी खोलगट भागांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. नरेंद्रनगर व लोखंडी पुलाखालीही गुडघाभर पाणी होते. हवामान विभागाने शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत चोविस तासांत ४६ मिलिमीटर पावसाची नोंद केली.
शहरात एक जूनपासून आतापर्यंत ९३३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. वर्षभरातील सरासरीच्या (९४३ मिलिमीटर) हा ९५ टक्के इतका पाऊस आहे. विदर्भात पावसाळी वातावरण रविवारपर्यंत कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. विदर्भात सध्या सगळीकडेच जोरदार पाऊस सुरू आहे. दमदार पावसामुळे बळीराजा खुश असून, पिकांचीही स्थिती समाधानकारक आहे. त्यामुळे यंदा बंपर पीक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Continues rain in Nagpur