ऐवजदारांची लागली लॉटरी, वर्धापनदिन ठरणार आनंदाचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

सद्य:स्थितीत नागपूर महानगरपालिकेत 4347 ऐवजदार कर्मचारी कार्यरत आहेत. दहाही झोनकडून एकूण 2163 प्रकरणे स्थायी करण्यासंदर्भात पुढे आली. त्यापैकी काही प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्याने त्या परत पाठविल्या. आता ही प्रकरणे सुधारणा करून आली असून, या ऐवजदारांना स्थायी करण्यात येणार आहे.

नागपूर : महापालिकेला 20 वर्षे सेवा देणाऱ्या ऐवजदार कार्डधारक कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात येणार आहे. महापालिकेत स्थायी सफाई कर्मचाऱ्यासाठी पात्र 2163 पैकी 1830 ऐवजदारांना महापालिकेच्या वर्धापनदिनी स्थायी करण्यासंबंधी कार्यवाहीचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी नुकतेच प्रशासनाला दिले. त्यामुळे महापालिकेचा वर्धापनदिन ऐवजदारांसाठी आनंदाचा दिवस ठरणार आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 सप्टेंबर 2019 रोजी महानगरपालिकेतील अस्थायी, ऐवजदार कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेतील अस्थायी, ऐवजदार कर्मचारी ज्यांच्याकडे मूळ ऐवजदार कार्ड असेल आणि ज्यांची 20 वर्षांची नियमित सेवा झाली आहे, अशांना दिलासा देणाऱ्या या आदेशामुळे मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव पारितही करण्यात आला होता. यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी नुकताच आढावा गेतला. त्यांनी आतापर्यंत पूर्णपणे कार्यवाही झालेल्या पात्र ऐवजदारांना स्थायी करा, असे निर्देश दिले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर महापौर संदीप जोशी यांनी डिसेंबरमध्ये घेतलेल्या बैठकीत 31 जानेवारी 2020 पर्यंत स्थायी करण्यासंबंधी निर्देश दिले होते. मात्र, प्रशासनाकडून केवळ कार्यवाहीच सुरू असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सविस्तर वाचा - ही खास कॉफी पळवणार तुमचे टेन्शन...वाचा

शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करून ऐवजदारांना स्थायी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त, सहायक आयुक्त (साप्रवि), विधी अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या बैठकीत झोननिहाय सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित करून सूचना फलकावर प्रकाशित करण्याबाबत निर्देश दिले होते. सद्य:स्थितीत नागपूर महानगरपालिकेत 4347 ऐवजदार कर्मचारी कार्यरत आहेत. दहाही झोनकडून एकूण 2163 प्रकरणे स्थायी करण्यासंदर्भात पुढे आली. त्यापैकी काही प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्याने त्या परत पाठविल्या. आता ही प्रकरणे सुधारणा करून आली असून, या ऐवजदारांना स्थायी करण्यात येणार आहे.

सुरेश भट सभागृहात जंगी कार्यक्रम
ऐवजदारांना स्थायी झाल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. महापालिकेचा वर्धापनदिन, अर्थात 2 मार्च रोजी ऐवजदारांना स्थायी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 31 मार्च 2020 पर्यंत 20 वर्षे सेवा देणाऱ्यांनाही स्थायी करण्यात येणार आहे. यासंबंधी कार्यवाहीचे निर्देशही महापौरांनी दिले.

झोननिहाय पात्र ऐवजदार

  • लक्ष्मीनगर 220
  • धरमपेठ 188
  • हनुमाननगर 223
  • धंतोली 284
  • नेहरूनगर 234
  • गांधीबाग 300
  • सतरंजीपुरा 146
  • लकडगंज 95
  • आशीनगर 90
  • मंगळवारी 50

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contract workers of NMC going to be permanent