तब्बल चार महिन्यांनी मिळाले अधिष्ठाता; मात्र, डॉ. निर्मलकुमार सिंगच्या निवडीवरून नवा वाद ​

मंगेश गोमासे
Monday, 2 November 2020

विद्यापीठातील लोक प्रशासन विभागाने ‘पब्लिक पॉलिसी अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन : इश्यूज अ‍ॅण्ड कंसन्स’ या नावाखाली तब्बल १८ लाख रुपये खर्च करून मार्च २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेच्या आयोजनात आर्थिक गैरप्रकाराचे त्यांच्यावर आरोप झाले होते.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चार विद्याशाखांच्या प्रभारी अधिष्ठाता पदावर अपेक्षेप्रमाणे विशिष्ट विचाराचे धोरण राबविणाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१७ मध्ये लोक प्रशासन विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विभागप्रमुख डॉ. निर्मलकुमार सिंग यांच्यावर आर्थिक गैरप्रकाराचे आरोप झाले. असे असतानाही त्याना अधिष्ठातापद दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना त्यांनी ‘हिंदुत्व' विषयावर काहीच दिवसांपूर्वी कार्यक्रम घेतल्यानेच त्यांना हे पद बहाल करण्यात आल्याचीही चर्चा आहे.

गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या अधिष्ठाता पदावर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी अधिष्ठाता म्हणून विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत रामटेकच्या ताई गोळवलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी तिरपूडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक डॉ. संजय कविश्वर, मानव्यविज्ञान शाखेत डॉ. निर्मलकुमार सिंग आणि आंतरशाखेत डॉ. राजश्री वैष्णव यांची निवड केली. डॉ. निर्मलकुमार सिंग हे काही महिन्यातच निवृत्त होत असताना अधिष्ठाता करण्यात आले आहे.

हेही वाचा - भाजपमध्ये खळबळ; झोन सभापतींच्या पतीचा ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘काम झाले हिशेब कधी करतो’

विशेष म्हणजे विद्यापीठातील लोक प्रशासन विभागाने ‘पब्लिक पॉलिसी अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन : इश्यूज अ‍ॅण्ड कंसन्स’ या नावाखाली तब्बल १८ लाख रुपये खर्च करून मार्च २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेच्या आयोजनात आर्थिक गैरप्रकाराचे त्यांच्यावर आरोप झाले होते. यावेळी माजी कुलगुरू डॉ. काणे यांनी चौकशी समितीही नेमली होती.

असे असतानाही डॉ. सिंग यांनी काही दिवसांआधी ‘बदलत्या काळात हिंदुत्व’ हा कार्यक्रम घेत शिक्षण मंचाला आवश्यक असलेली योग्यता सिद्ध केल्यानेच त्यांची अधिष्ठातापदी वर्णी लागल्याची चर्चा होत आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

अधिक माहितीसाठी - Success story : उच्चशिक्षित तरुणाची शेतीकडे धाव, फळबागेतून वर्षाला कमावितो ४० लाखांचा नफा

डॉ. वैष्णव यांचीही निवड?

विद्याापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाची (एम.एड.) विद्याार्थिनी प्रीती फडके हिने विभाग प्रमुख डॉ. राजश्री वैष्णव यांच्यासह अन्य तीन प्राध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. याशिवाय दुसरीही तक्रार करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यानंतरही पुन्हा एकदा डॉ. वैष्णव यांची निवड का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: controversy over Dr. Nirmal Kumar Singhs choice