
नागपूर ः दिवाळीनंतर कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली असून गेल्या काही दिवसांत अडीचशेपेक्षा कमी झालेली बाधितांच्या संख्येने पुन्हा तीनशेवर गेली. शहरातील विविध लॅबमधून आलेल्या अहवालातून आज ३३२ नवे बाधित आढळून आले. शुक्रवारी जिल्ह्यात आठ बळींची नोंद करण्यात आली. सद्यःस्थितीत जिल्ह्यात साडेतीन हजार रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात आज ग्रामीणमध्ये दोन तर शहरात सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्ह्याबाहेरील एकाने शहरात शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या ३ हजार ४५६ पर्यंत पोहोचली आहे. यात शहरातील २ हजार ४४४, ग्रामीणमधील ५७९ तर जिल्ह्याबाहेरील ४३३ जणांचा समावेश आहे. शहरातील विविध लॅबमध्ये ४ हजार ४४३ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
यातून ३३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरातील १९५ तर ग्रामीण भागातील १३६ जण आज बाधित झाल्याचे निष्पन्न झाले. बाधितांची संख्या आज पुन्हा तीनशेपेक्षा जास्त दिसून आली. शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ४ हजार ५०९ पर्यंत पोहोचली. यात ग्रामीण भागातील २१ हजार ३०५ तर शहरातील ८२ हजार ५८९ जणांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली.
जिल्ह्याबाहेरील ६१५ जणही शहरात तपासणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आले. गेल्या काही दिवसांत दैनिक बाधितांचा आकडा अडीचेपेक्षाही खाली आला होता. आता पुन्हा तीनशेवर बाधित आढळून येत असल्याने प्रशासन चिंतातुर दिसत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी वाढली असून वाढत्या थंडीमुळे कोरोना संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोना पुन्हा वाढण्याची ही सुरुवात तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
९७ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यात आज ३६६ जणांना कोरोनावर मात केली. शहरातील २६७ तर ग्रामीण भागातील ९९ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या ९७ हजार ४९८ पर्यंत पोहोचली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांचा दर ९३.२९ टक्के आहे. आतापर्यंत ग्रामीणमधील १९ हजार ९८६ तर शहरातील ७७ हजार ५१२ जण कोरोनामुक्त झाले. दिवाळीतील फटाक्यांच्या प्रदूषणामुळे आरोग्य यंत्रणेचे कोरोनामुक्त झालेल्यांवरही नजर राहणार आहे. सध्या जिल्ह्यात तीन हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.