कोरोनामुळे बदलले ‘व्हॉईट कॉलर’ माफियांचे लक्ष्य, महसूल विभाग झाला मौन, काय आहे राजकारण...

संदीप भुयार
Wednesday, 16 September 2020

कोरोनामुळे शासनाने विकासकामांचा निधी परत बोलावला आहे. त्यामुळे ‘व्हॉईट कॉलर’ माफियांचे धंदे ठप्प पडले आहेत. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी या माफियांनी आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला आहे. ग्रामीण  भागात विशेष रूची दर्शवून काय आणि कोणते उद्योग करतात हे  ‘व्हॉईट कॉलर’ माफिये? जाणून घेऊया....

कळमेश्वर (जि.नागपूर) : राज्य शासनाने विकासकामांचा निधी कोरोनासारख्या अडचणीच्या काळात नागरिकांच्या आरोग्यावर खर्च करण्यासाठी परत मागविला  त्यामुळे अनेक विकासकामांना खीळ बसली आहे. कुठलेही विकास काम म्हटले की, साहेबांचे टक्के कंत्राटदाराआधीच काढून ठेवण्याची पध्दत आहे. मात्र, विकासकामेच नसल्याने कंत्राटदारांकडून मिळणारे टक्केच बंद झाल्याने ‘व्हॉईट कॉलर’ माफियांनी काळ्या मातीचीच विक्री करण्याच्या कामाकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

अधिक  वाचाः कोण ‘तो’? आसवांच्या ओंजळीत सोडून गेला आठवणींचे पक्षी!

अर्धी टेकडीच झाली गायब
वाळू, मुरूम, दगड आदींचे अवैध उत्खनन व त्याच्या वाहतुकीकडे सध्या या मंडळीकडून भर देण्यात येत आहे़. असाच काहीसा प्रकार मोहपा परिसरात सुरू आहे.जवळच्या खैरी शिवारात तर या माफियांनी कहरच केला आहे. जवळपास अर्धी टेकडी विनापरवानगी खोदून मुरूमाची विक्री केली आहे. या व्यवसायात खर्च कमी व काही वेळातच जास्त मोबदला मिळत असल्याने या ‘व्हॉईट कॉलर’ माफियांनी खैरी शिवार लक्ष केले आहे़. गेल्या काही दिवसाआधी मोहपा पालिका क्षेत्रात वाळूची अवैध साठवणूक करण्यात आली होती़. त्या वाळूचा पंचनामा करून महसूल विभागाने ती जप्त केली होती़. ही वाळू कुणाची आहे, अशी विचारणा करणारे पत्रही पालिका प्रशासनाला देण्यात आले़. मात्र, अद्यापही त्या वाळूचा मालक कोण, याचे उत्तर महसूल विभागाला मिळाले नसल्याची माहिती आहे. यावरूनच ती वाळू चोरीची असल्याने दिसून येते.

म्हणे, रॉयल्टी आहे !
खैरी शिवारात असलेली टेकडी एका शेतकऱ्यांची आहे़  ज्यावेळी कुणी या अवैध उत्खननाच्या वेळी प्रश्न उपस्थित करतो, तेव्हा ती व्यक्ती शेती माझी आहे, आणि उखननाची ‘रॉयल्टी’ असल्याचे सांगतो़. मात्र, या व्यक्तीने काही महिन्याआधी शेतात मुरूम टाकण्याच्या नावावर ही ‘रॉयल्टी’ काढली होती़ आणि तीच रॉयल्टी आताही सुरू असल्याचे भासवतो़.

हेही वाचाः मास्क घालायला सांगणाऱ्या डॉक्टरचेच फोडले थोबाड, कोण होते ‘ते’?
 

साहेबांचा येतो फोन...
कुठल्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांने या व्यवसायांवर कारवाई केली तर त्यांना या ‘व्हॉईट कॉलर’ साहेबांचा कारवाई थांबविण्यासाठी फोन येतो़.  त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतीमध्ये आहेत. त्यामुळे परिसरात कुणीही तक्रार करण्यासाठीसुध्दा समोर येत नसल्याचे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

माहिती मिळाल्यास कारवाई करू !
या आधी कारवाई करण्यात आली आहे. ट्रक व जेसीबी जप्त करण्यात आली होती़. प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. उत्खनन किंवा गौण खनिजांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास कारवाई करू.
- सचिन यादव
  तहसीलदार, कळमेश्वर

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona changes ‘white collar’ mafia target, revenue department becomes silent