दोन आठवडे झाले, धोका टळला तरीही बंदी...वाचा काय आहे प्रकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

9 मे रोजी जवाहरनगरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या परिसरातील नागरिकांना विलगीकरणात पाठवून महापालिकेने परिसर सील केला. त्यानंतर विलगीकरणातील दोघे कोरोनाबाधित आढळले. परंतु, या दोघांच्या संपर्कातील कुणालाही विलगीकरणासाठी किंवा तपासणीसाठी नेण्यात आले नाही.

नागपूर : दोन आठवड्यांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेल्या जवाहरनगरातील नागरिक निर्बंधाला कंटाळून आज रस्त्यावर आले. धोका टळल्यानंतरही प्रतिबंध लावल्याने नागरिकांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातून जवाहनगर वगळावे, अशी मागणी करीत नागरिकांनी हनुमाननगर झोन कार्यालयापुढे गर्दी केली.

काल, शनिवारी पांढराबोडी परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात महापालिकेविरुद्ध असंतोष वाढत असल्याचे चित्र आहे. 9 मे रोजी जवाहरनगरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या परिसरातील नागरिकांना विलगीकरणात पाठवून महापालिकेने परिसर सील केला. त्यानंतर विलगीकरणातील दोघे कोरोनाबाधित आढळले. परंतु, या दोघांच्या संपर्कातील कुणालाही विलगीकरणासाठी किंवा तपासणीसाठी नेण्यात आले नाही.

त्यामुळे धोका टळला असून जवाहरनगर परिसरातील प्रतिबंध तत्काळ हटविण्याची मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष परशू ठाकूर, नगरसेवक अभय गोटेकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली. जवाहरनगर परिसरातील सर्वच मार्ग टिनाचे अडथळे लावून बंद केले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांनाही आवश्‍यक गरजांसाठी बाहेर पडणे कठीण झाले आहे. प्रतिबंध लावल्यानंतर नागरिकांनी प्रतिसाद दिला. परंतु, आता दोन आठवड्यानंतरही प्रतिबंध कायम असल्याने नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर आले.

परशू ठाकूर, अभय गोटेकर यांनी हनुमाननगर झोनच्या सहायक आयुक्तांना तत्काळ प्रतिबंध हटविण्याचे निवेदन दिले. दरम्यान, काल पांढराबोडी परिसरातील नागरिकांनीही प्रतिबंध हटविण्याची मागणी केली. यावेळी आमदार विकास ठाकरे यांनीही नागरिकांच्या मागणीचे समर्थन करीत आंदोलनात भाग घेतला.

 पडदे लावून तरुणांनी मध्यरात्री सुरू केला धिंगाणा, मग...

आमदार मतेही पोहोचले

संतप्त नागरिक रस्त्यावर आल्याचे कळताच दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मतेही येथे पोहोचले. नागरिकांचे ऐकल्यानंतर त्यांनीही मागणी लावून धरली. स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनीही निर्बंध हटविण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
 

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

जवाहरनगर परिसरातील नागरिक एकत्र आल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. यावेळी हुडकेश्‍वर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकांसह इतर शिपाई उपस्थित होते. मात्र, नागरिकांच्या संतापामुळे त्यांनीही सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा मनावर घेतला नाही.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona : Citizens on the streets tired of restrictions