नागपुरात सामाजिक, राजकीय, धार्मिक सभांना बंदी.... प्रशासनाने दिले हे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

संपर्कामुळे होणारा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने जमावबंदीचे पाऊल उचलले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वीच राज्य सरकारने मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

नागपूर  : राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुण्यासह नागपुरात संशयितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये यासाठी पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून नागपूर शहरात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी हे आदेश काढले असून उद्यापासून मंगळवारपासून (ता.17) 31 मार्चपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना आता एकत्र येता येणार नाही.

संपर्कामुळे होणारा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने जमावबंदीचे पाऊल उचलले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वीच राज्य सरकारने मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, वाचनालये, आयटीआय, कौशल्यविकास केंद्रे आणि प्रशिक्षण केंद्रांना 31 मार्चपर्यंत सुटी देण्यात आली.

आज ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, वाचनालये, आयटीआय, कौशल्यविकास केंद्रे आणि प्रशिक्षण केंद्रे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. असे असतानाही शहरात बऱ्याच कार्यक्रमांसाठी नागरिक एकत्र येत असल्याने सहआयुक्तांनी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहे.

या आदेशानुसार संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, व्यावसायिक प्रदर्शन, शिबिरे, पर्यटन, सभा, मेळावे, धरणे, आंदोलने आदी कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय अशा कार्यक्रमांना संबंधित विभागांनी परवानगी न देण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे.

टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल कंपन्यांवर निर्बंध

पोलिसांनी खासगी टूर ऑपरेटर आणि ट्रॅव्हल कंपन्यांवरही निर्बंध घातले आहेत. सर्व आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय टूर तसेच सहली स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रुप बुकिंग करून सहलीला जाणारेही पोलिसांच्या रडारवर आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect : Ban on gadaring in Nagpur