उपराजधानीत कोरोनाचा पहिला बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरून त्यांना शनिवार, चार एप्रिलला मेयोत भरती करण्यात आले. रविवार, पाच रोजी त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. परंतु सोमवारी नमुने येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

नागपूर  : उपराजधानीत कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला असून, मृत 68 वर्षीय व्यक्‍ती सतरंजीपुरा बडी मशीद येथील रहिवासी आहे. मेयो रुग्णालयातील संशयित वॉर्डात चार एप्रिलपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परंतु, त्यापूर्वीच रविवारी मध्यरात्रीनंतर त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय दिल्ली ते नागपूर प्रवास करून आल्यानंतर आमदार निवासातील एकांतवासात अर्थात विलगीकरणातील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल सोमवारी (ता.6) आला.

कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरून त्यांना शनिवार, चार एप्रिलला मेयोत भरती करण्यात आले. रविवार, पाच रोजी त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. परंतु सोमवारी नमुने येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दिल्लीच्या मरकज येथून आलेल्या व्यक्‍तीच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जाते. दिल्लीच्या मरकजहून आलेल्या नागरिकांचा जत्था शहरात फिरत असल्याची चर्चा मेयोच्या वर्तुळात आहे.

याबाबत मनपाचे अधिकारी, पोलिसांना कळविले असून, उद्या मृताचे नातेवाईक तसेच संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करून त्यांचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती मेयो प्रशासनाकडून देण्यात आली. विशेष म्हणजे भरती केल्यानंतर कुटुंबीतील कुणीही त्यांची विचारपूस करण्यास आले नसल्याचे सांगण्यात आले.

एम्सच्या प्रयोगशाळेत आज 53 नमुने तपासण्यात आले असून, चंद्रपुरातील 39 वर्षीय युवक पॉझिटिव्ह आहे. चार दिवसांपासून विलगीकरणात होता. त्याला तातडीने उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवले. कोरोनाबाधिताची संख्या आता 19 वर पोहचली आहे. अखिल भारतीय आयुविज्ञान संस्था (एम्स)च्या विषाणू प्रयोगशाळेतील तपासणी अहवालातून आलेला रुग्ण इंडोनेशियातून दिल्लीमार्गे नागपूरला परतला.

मेडिकलमध्ये तपासणीसाठी आला होता. येथे त्याचे नमुने घेतल्यावर त्याला आमदार निवासातील विलगीकरणात ठेवले गेले. त्याचे नमुने सहा एप्रिल रोजी तपासले असता, त्याला कोरोनाची बाधा असल्याचे पुढे आले. ही माहिती प्रशासनाला कळताच तातडीने त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवून त्याच्या संपर्कातील जास्तीत व्यक्तींची माहिती मिळवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून आहे. या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना मेडिकल, मेयो तसेच चंद्रपूर येथील मेडिकलमध्ये हलवून त्यांची तपासणी केली जाणार आहे.

 हनिमुनवरून परतले नवदाम्पत्य... नंतर राजधानी एक्‍स्प्रेसमध्ये घडला हा प्रकार

मध्य नागपुरातील ते कुटुंबीय निगेटिव्ह

मध्य नागपुरातील 32 वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नमुन्यांचा अहवाल रविवारी रात्री उशिरा आला. यात त्या व्यक्तीची पत्नी, पाच मुले, दोन भाचे अशा जवळच्या आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. या कुटुंबातील व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याचा अंदाज डॉक्‍टरांकडून वर्तवला गेला. परंतु खबरदारी म्हणून 14 दिवस विलगीकरणात राहावे लागेल.

 
शहरात आज 100 चाचण्या

एम्समध्ये सोमवारी 56 नमुने तपासण्यात आले. यात एक कोरोनाबाधित आढळला. तर मेयो रुग्णालयात दुरुस्त झालेल्या यंत्रावर 30 नमुने तपासण्यात आले. आज पहिल्यांदाच माय लॅबच्या किटद्वारे नमुने तपासण्याची चाचणी करण्यात आली.

 

वैद्यकीय शिक्षण विभागाने केली कामाची वाटणी

उपराजधानीत "मेयो' आणि "एम्स' येथे कोरोना विषाणूंचे नमुने तपासणीची सोय आहे. नमुने तपाणीच्या कामाचा व्याप बघता सध्या मेयोवर भार आहे. यामुळे पुढील काळात वैद्यकीय शिक्षण विभागाने कोरोना तपासणीबाबतची विभागणी केली आहे. विदर्भातील 6 जिल्ह्यातील नमुने तपासणीचा भार "मेयो'तील प्रयोगशाळेवर आहे. तर "एम्स'मध्ये 5 जिल्ह्यातील नमुने तपासण्यात येतील. मेयोकडे नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा या जिल्ह्यातील रुग्णांचे नमुने तपासण्यात येतील. तर "एम्स'मध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येईल. मेयोतील सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र खडसे आणि वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सोमवारी एम्समधील तज्ज्ञांना एका सायकलमध्ये सुमारे 30 ते 33 नमुने तपासण्याबाबतचे तंत्र सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona first death in nagpur