हनिमुनवरून परतले नवदाम्पत्य... नंतर राजधानी एक्‍स्प्रेसमध्ये घडला हा प्रकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

राजधानी एक्‍स्प्रेसच्या बी-3 डब्यातून दिल्लीच्या दिशेने निघाले. हात लपवूनच त्यांचा प्रवास सुरू होता. नववधू हात धुण्यासाठी गेली असता तिच्या हातावरील स्टॅम्प सहप्रवशाला दिसला. त्याने टिसीला माहिती दिली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. काजीपेठ स्टेशनवर तपासणी केली असता दोघांनाही ताप असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लागलीच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात काळजी घेतली जात असतानाच या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचेही प्रकार सुरू आहेत. क्वारेंटाईन करून ठेवण्यात आलेल्या नवदाम्पत्याने रेल्वेतून पळ काढला. हातावरील स्टॅम्प दिसताच वेळीत त्यांना ताब्यात घेऊन गाडीतून उतरवून घेण्यात आले. पण, याबाबत माहिती पसरल्याने बेंगळुरू-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांमध्ये दहशत पसरली. भीतीच्या वातावरणातच प्रवाशांना इच्छित स्थळ गाठावे लागले. 

प्राप्त माहितीनुसार ताब्यातील दाम्पत्य दिल्लीतील आहे. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. मधुचंद्रासाठी ते बाली येथे गेले होते. तिथून ते हैदराबादला परतले. परंतु विदेशातून आल्याने त्यांना क्वारेंटाईन करून ठेवण्यात आले होते. नियमाप्रमाणे त्यांच्या हातावर स्टॅम्पही लावला. परंतु संधी मिळताच दोघांनीही पळ काढत सिकंदराबाद गाठले. राजधानी एक्‍स्प्रेसच्या बी-3 डब्यातून दिल्लीच्या दिशेने निघाले. हात लपवूनच त्यांचा प्रवास सुरू होता. नववधू हात धुण्यासाठी गेली असता तिच्या हातावरील स्टॅम्प सहप्रवशाला दिसला. त्याने टिसीला माहिती दिली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. काजीपेठ स्टेशनवर तपासणी केली असता दोघांनाही ताप असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लागलीच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे... यवतमाळ, वर्धा कडकडीत बंद

कोरोनाची दहशत 
या डब्यातील सर्वच प्रवाशांनाही उतरवून अन्य डब्यात बसविण्यात आले. फवारणी करून डबा निर्जंतुकीकरण करण्यात आला. सायंकाळी ही गाडी नागपूर स्टेशनवर पोहोचताच सर्व डब्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रामुख्याने हाताचा सतत स्पर्श होणाऱ्या आणि तोंडाजवळ असणारे भाग सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात आले. गाडीत कोरोना संशयित प्रवासी असल्याची माहिती पसरल्याने अन्य प्रवाशांमध्ये भीती दिसून आली. लगतच्या डब्यातील प्रवासी मोहम्मद निसाख, अभिषेक कुमार, प्रणय रॉय यांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केली. सोबतच रेल्वे प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे कौतूकही केले. 

रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी 
कोरोनामुळे गेल्या आठवडाभरापासून रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. यामुळे रेल्वेगाड्याही रद्द करण्यात येत आहेत. शनिवारी मात्र रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी दिसून आली. अनेक शहरांमध्ये अंशत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी, कामगार आणि मजूरांनी गावी परतने पसंत केले आहे. प्रामुख्याने दिल्ली, गोरखपूरसह उत्तर प्रदेश व बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी अधिक होती. एकाचवेळी गावी परतण्याची गर्दी झाल्याने "सोशल डिस्टन्स'च्या संकल्पनेला बाधा निर्माण झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married couple return from honeymoon