तेराशे गावांमध्ये कोरोनाला ‘नो एन्ट्री‘ ;जि.प.चे नियोजन यशस्वी

नीलेश डोये
Thursday, 22 October 2020

प्रशासनाने सुरुवातीपासूनच कोरोना दक्षता समिती स्थापन केली. आरोग्य विभागाने अहोरात्र मेहनत घेतली. जिल्हा परिषदेमध्येच नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविली. या उपाययोजना आणि प्रयत्नांना यश आल्याचे दिसते.

नागपूर : कोरोनाचा विषाणू गावात पोहोचल्याने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली. परंतु जिल्हा परिषदेने तत्काळ नियोजन करीत उपाययोजना केल्या. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूला गावाबाहेरच रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आले. जिल्ह्यातील १,८६७ गावांपैकी १,३०० वर गाव अद्याप तरी कोरोनापासून दूर आहेत.

मार्च महिन्यात कोरोना शहरात दाखल झाला. त्यानंतर ग्रामीण भागातही पोहोचला. आता शहरासहित ग्रामीण भागातील बाधितांची संख्या हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याचा इशारा यंत्रणांकडून देण्यात आला आहे.

ग्रामीण भागात कामठी, हिंगणा, नागपूर ग्रामीण हे तीन तालुके वगळल्यास प्रादुर्भावाची तीव्रता कमी असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात एकूण ७६८ ग्रामपंचायती असून त्यात एकूण १,८६७ गावे आहेत. यातील ४५७ ग्रामपंचायती आणि ५३९ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरी भागांशी निगडीत तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते.

बीडीओंनी चक्‍क तीन शिक्षकांनाच विस्तार अधिकारी म्हणून दिला अतिरिक्त प्रभार; मुख्यालय अनभिज्ञ

तर ३११ ग्रामपंचायती आणि १,३०० गावांमध्ये अद्यापही या विषाणूचा शिरकाव झालेला नाही. यात उमरेड तालुक्यातील सर्वाधिक १६१ गावे आणि त्याखालोखाल कुही तालुक्यातील १५९, काटोल तालुक्यातील १३७ आणि रामटेक तालुक्यातील १२४ गावांचा समावेश आहे. प्रशासनाने सुरुवातीपासूनच कोरोना दक्षता समिती स्थापन केली. आरोग्य विभागाने अहोरात्र मेहनत घेतली. जिल्हा परिषदेमध्येच नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविली. या उपाययोजना आणि प्रयत्नांना यश आल्याचे दिसते.

सीईओंनी स्वतःपासून दूर ठेवला कोरोना
ग्रामीण भागात कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे सोबत सीईओ योगेश कुंभेजकर यांनी गावागावांमध्ये भेटी देऊन प्रत्यक्ष उपाययोजनांची पाहणी करीत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे काम करताना विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी ठाकरे, तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची बाधा झाली. परंतु सीईओ कुंभेजकर यांनी कोरोनाला आपल्यापासून लांबच ठेवले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona has 'no entry' in thirteen hundred villages; ZP planning successful