हे काय... मेयोतून पळाले कोरोना बाधित, सजग सुरक्षादलामुळे टळला हा प्रसंग   

योगेश बरवड
Sunday, 6 September 2020

बाळंतीण महिला पतीसोबत गावी परतत होती. दिवस भरले असल्याने सतना येथील मूळ रहिवासी असलेल्या अन्य तीन नातेवाइकांनाही त्यांनी सोबत घेतले. शुक्रवारी संघमित्रा एक्स्प्रेसमधूनच त्यांचा प्रवास सुरू होता. गाडीतच वेदना सुरू झाल्याने महिलेसह नातेवाइकांना नागपूर रेल्वे स्थानकावर उतरवून घेण्यात आले.

नागपूर : उपचार अर्ध्यावर सोडून ओल्या बाळंतिणीसह तीन कोरोनाबाधित रुग्णांनी मेयोतून पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सर्वजण संघमित्रा एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असल्याचे हुडकून काढले. ही गाडी बैतूल स्थानकावर पोहोचताच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणातील बाळंतीण महिला पतीसोबत गावी परतत होती. दिवस भरले असल्याने सतना येथील मूळ रहिवासी असलेल्या अन्य तीन नातेवाइकांनाही त्यांनी सोबत घेतले. शुक्रवारी संघमित्रा एक्स्प्रेसमधूनच त्यांचा प्रवास सुरू होता. गाडीतच वेदना सुरू झाल्याने महिलेसह नातेवाइकांना नागपूर रेल्वे स्थानकावर उतरवून घेण्यात आले. दरम्यान नातेवाइकांनी उपस्टेशन कार्यालयाकडून त्याच तिकिटावरर प्रवासाची परवानगी मिळवून घेतली. अवघडलेली अवस्था लक्षात घेता महिलेला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे सर्वप्रथम तिची कोरोना तपासणी करण्यात आली. 

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'
 

ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल येताच खबरदारीचा उपाय म्हणून सोबत असणाऱ्या सर्व नातेवाइकांची तपासणी करण्यात आली. यात पती व अन्य एक बाधित असल्याचे निदान झाले. दरम्यान महिलेने बाळाला जन्म दिला. बाळ बाळंतीण सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत उपचार घ्यावेच लागतील असे त्यांना सांगण्यात आले. पण, भीतीपोटी पाचही जणांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी ८ वाजता सर्व जण फलाट क्रमांक २ वर आले. ०२२९५ बंगळुरू-दानापूर संघमित्रा एक्स्प्रेसमघून रवाना झाले.

‘आत्मा’मुळे लागला शोध

दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण बेडवर नसल्याने मेयोत एकच गोंधळ उडाला. शोधाशोध सुरू झाली. महिलेला रेल्वेतून उतरवून आणल्याची कल्पना मेयोच्या रुग्णांना होती. मेयोचा सुरक्षा रक्षक सकाळी ११ वाजता स्टेशनवर आला. आरपीएफला माहिती दिली. नागपूर स्टेशनवर ‘आत्मा’ प्रणालीवरून रुग्णांची नोंद ठेवली जाते. त्यामुळे तातडीने पाचही जण संघमित्रा एक्स्प्रेसने रवाना झाल्याचे दिसले. सीसीटीव्ही फुटेजमधूनही ते गाडीत बसल्याचे दिसले. गाडी दुपारी १२ वाजता बैतुलला पोहोचणार असल्याचे कळताच स्थानिक आरपीएफला सूचना देण्यात आली. गाडी बैतुलला पोहोचताच तीघांनाही खाली उतरवण्यात आले. त्यांना रुग्णवाहिकेतून परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infected patient ran away from Mayo Hospital