साहेब, डॉक्‍टर खुर्चीत नाही त्यांची सुटी आहे का?, वाचा रुग्णांची व्यथा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

कोरोना संकट आले त्या दिवसापासून बाह्यरुग्ण विभागासह अनेक वॉर्डात कोरोनावर उपचार करणारे डॉक्‍टर कोविड वॉर्डात दिसतात. मात्र, मेडिकलमधील अनेक वॉर्डांमध्ये डॉक्‍टरही दिसत नाही. आणि रुग्णही दिसत नाही.

नागपूर : साहेब, पोराले भोवळ आली. तो पडला. हाड मोडलं. तालुक्‍यातील डॉक्‍टरकडे नेलं, परंतु त्यांनी मेडिकलमध्ये पाठवलं. येथी आलो, परंतु डॉक्‍टर खुर्चीत दिसले नाही. कोणालेही विचारलं तर डॉक्‍टर आले नाही, हेच सांगतात... साहेब, डॉक्‍टरला सुटी आहे का? आता लेकराले कोठी घेऊन जाऊ... ही व्यथा अनेक पालकांची आहे.

यावरून कोरोनाच्या संकटकाळात मेडिकल, मेयोतील औषधवैद्यक, श्‍वसनरोग, बधिरीकरण तसेच कान, नाक, घसा विभागातील डॉक्‍टर सोडून इतर विभागाच्या बाह्यरुग्ण कक्षात डॉक्‍टर दिसत नाही. कोरोनामुळे या डॉक्‍टरांना सुटी दिली का? असा प्रश्‍न खुद्द रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत.

कोरोना संकट आले त्या दिवसापासून बाह्यरुग्ण विभागासह अनेक वॉर्डात कोरोनावर उपचार करणारे डॉक्‍टर कोविड वॉर्डात दिसतात. मात्र, मेडिकलमधील अनेक वॉर्डांमध्ये डॉक्‍टरही दिसत नाही. आणि रुग्णही दिसत नाही. कोरोनाच्या आणिबाणीमुळे अनेक डॉक्‍टर सेवेतून हरवले असल्याचे चित्र आहे. या डॉक्‍टरांसह अनेक कर्मचारीही गैरहजर असल्याची जोरदार चर्चा मेयो-मेडिकल वर्तुळात रंगली आहे.

पत्नीने केली पतीची हत्या आणि मुलाने फोडली बापाच्या खुनाला वाचा

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना शासनाने कोविड रुग्णालये म्हणून घोषित केले आहे. सर्वच रुग्णालयांत कमी-अधिक प्रमाणात कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. मुंबई, पुणे, अकोला, अमरावती, नाशिक, नागपूरसह इतरही काही शहरात सातत्याने बाधितांचा आकडा वाढत आहे. यामुळे मेडिसीन, श्‍वसनरोग, भूलतज्ज्ञ तसेच कान, नाक, घसा रोग विभागातील डॉक्‍टरांवर अतिरिक्त ताण आहे.

कोरोनाग्रस्तांवर उपचारात औषधवैद्यक, श्‍वसनरोग आणि बधिरीकरणशास्त्र विभागातील डॉक्‍टरांची भूमिका महत्त्वाची आहे. यामुळे या विभागातील सर्वच निवासी डॉक्‍टर, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक दिसतात. मात्र, इतर आजारांवर उपचार करणारे डॉक्‍टर दिसत नसल्याची खंत रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. विशेष असे की, प्रशासनाला सूचना न देता अनेक डॉक्‍टर सेवेत दिसत नसल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

 

सूक्ष्मजीवशास्त्र विभागावर चाचण्यांचा भार

क्‍लिनिकल विभागातील डॉक्‍टर कोविड वॉर्डातील सेवेत दिसतात. परंतु नॉन-क्‍लिनिकल विभागातील डॉक्‍टर कॉलेजमध्ये दिसतात. त्यांना शिकवण्याशिवाय इतर फारसे काम नसते. यामुळे नॉनक्‍लिनिकल डॉक्‍टर खुर्चीत दिसतात. मात्र सूक्ष्मजीव शास्त्र, जीवरसायन शास्त्र विभागातील डॉक्‍टरांकडे विषाणू प्रयोगशाळेत नमुने तपासण्याची जबाबदारी असल्याने ते प्रयोगशाळेत दिसतात. विकृतीशास्त्र विभागातील डॉक्‍टरांवर रुग्णांच्या रक्तासह इतर काही तपासणी करण्याचा भार आहे. पीएसएम विभागातील डॉक्‍टरांकडून सरकारी रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सातत्याने सुरू असल्याची माहिती आहे.

 

परिचर म्हणतात, "आताच होते...'

सकाळी डॉक्‍टर येतात. हजेरी लावतात. तास दोन तास दिसतात आणि अचानक गायब होतात, रुग्णाचे नातेवाईक डॉक्‍टरचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. येथे दरवाजावर उभ्या असलेल्या परिचरला कधीही विचारणा केली की, "आत्ताच होते....' वॉर्डात गेले असतील असे उत्तर मिळते. वॉर्डातून बघून आल्यानंतर विचारणा केली की, मग त्यांची पंचाईत होते. नागपूरच्या सुपर स्पेशालिटीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे चित्र दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona : not see doctors in the various departments of Medical-Mayo