तीन हजारांवर बाधितांची दिवाळी विलगीकरणात; नव्या २३४ जणांची भर

राजेश प्रायकर
Friday, 13 November 2020

जिल्ह्याबाहेरील ४४६ बाधितांचाही शहरात मृत्यू झाला. दरम्यान, आज २८३ बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. यात शहरातील २१० तर ग्रामीण भागातील ८१ जणांचा समावेश आहे.

नागपूर : दिवाळीमुळे घराघरांत चैतन्य असले तरी तीन हजारांवर बाधितांवर उपचार सुरू असून, ते विलगीकरणात आहेत. त्यामुळे दिवाळीतील त्याच्या उत्साहावर कोरोनामुळे विरजण पडले. यात नव्याने आज २३४ जणांची भर पडली. जिल्ह्यात गुरुवारी चार कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. २८३ जण कोरोनामुक्त झाल्याने दिवाळीचा आनंद लुटता येणार आहे.

शहरातील विविध लॅबमध्ये आज ४ हजार २०८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातून नवे २३४ जण बाधित आढळून आले. ऐन दिवाळीच्या तोंडावर बाधित आढळून आल्याने त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. यात ग्रामीण भागातील ८१ तर शहरातील १४९ जणांचा समावेश आहे. चौघे जिल्ह्याबाहेरील आहेत.

सविस्तर वाचा - बाप रे बाप! बाजारात आली २४ कॅरेट अस्सल सोन्याची मिठाई; किंमत ऐकून व्हाल थक्क

एकूण बाधितांची संख्या १ लाख ५ हजार ८८८ पर्यंत पोहोचली. नव्या बाधितांसह आता जिल्ह्यात ३ हजार २६८ जण उपचार घेत असून, ते विलगीकरणात आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.

दरम्यान, जिल्ह्यात आज ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात शहर व ग्रामीण भागातील प्रत्येकी दोन बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरच्या चौघांंनी शहरात उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या ३ हजार ४९८ वर पोहोचली आहे. यात शहरातील २ हजार ४६३ तर ग्रामीण भागातील ५८९ बळींचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी - लाचखोर स्वीय सहायकाकडे आढळली लाखोंची कॅश; एसीबीची कारवाई

जिल्ह्याबाहेरील ४४६ बाधितांचाही शहरात मृत्यू झाला. दरम्यान, आज २८३ बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. यात शहरातील २१० तर ग्रामीण भागातील ८१ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९९ हजार १२२ बाधित कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात सध्या ३ हजार २६८ बाधित उपचार घेत असून यातील २ हजार १६९ जण घरीच उपचार घेत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patient Diwali in darkness