लाचखोर स्वीय सहायकाकडे आढळली लाखोंची कॅश; एसीबीची कारवाई

अनिल कांबळे
Friday, 13 November 2020

संचालकाने याची एसीबीकडे तक्रार केली. अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनात एसीबीच्या पथकाने बुधवारी वर्मा यांना अटक केली. त्यांच्या घराची झडती घेतली.

नागपूर : सूतगिरणीतील सुरक्षा रक्षकांचे वेतन काढण्यासाठी वस्त्रोद्योग विभागातील आयुक्तांचे स्वीय सहायक नितीन सुरेश वर्मा (वय ५७, रा. ट्राफिक चिल्ड्रेन पार्क, धरमपेठ) यांनी पाच लाखांची लाच मागितली होती. त्यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला १८ लाखांची रोख व १२० ग्रॅम सोन्याचे दागिने आढळले. एसीबीनी याची नोंद घेत तपास सुरू केला आहे.

नागपुरातील सहकारी सूतगिरणी येथे सेक्युरिटी एजन्सीच्या संचालकाने आठ सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. ऑक्टोबर २०१५ ते मार्च २०१९ या कालावधीतील ३४ लाख ५५ हजार ९४४ रुपये तसेच डिसेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० दरम्यानचे नऊ लाख ४६ हजार ८३२ रुपयांचे थकित वेतन काढण्यासाठी वर्मा यांनी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

संचालकाने याची एसीबीकडे तक्रार केली. अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनात एसीबीच्या पथकाने बुधवारी वर्मा यांना अटक केली. त्यांच्या घराची झडती घेतली.

अधिक माहितीसाठी - चहा विक्रेत्याच्या मुलाने उभारली बँक; विपरित परिस्थितीवर मात करीत गाठले यशोशिखर

एसीबीच्या पथकाला त्यांच्या निवासस्थानी १८ लाख ४५ हजार ८९२ रुपये, १२० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ३८ लाख ३६ हजार रुपयांची मालमत्ता आढळली. दरम्यान, एसीबीच्या पथकाने वर्मा यांना गुरुवारी एसीबी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची एक दिवसासाठी एसीबी कोठडीत रवानगी केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of cash found in PA house