esakal | उपराजधानीत पुन्हा कोरोनाचा उद्रेक; आजची रुग्णसंख्या बघून सरकेल पायाखालची जमीन 

बोलून बातमी शोधा

corona patients increasing tremendously in Nagpur

मागील पंधरवड्यात २४, २५ व २६ फेब्रुवारीला सलग तीन दिवस अकराशे रुग्ण आढळले होते. त्यानंतर मागील आठवड्यात बाधितांचा आलेख काही प्रमाणात खाली आला होता.

उपराजधानीत पुन्हा कोरोनाचा उद्रेक; आजची रुग्णसंख्या बघून सरकेल पायाखालची जमीन 
sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर ः दहा दिवसांपूर्वी सलग तीन दिवस अकराशे बाधित आढळून आले होते. मात्र, आज गेल्या अनेक महिन्यानंतर प्रथमच बाधितांची संख्या चौदाशेच्या उंबरठ्यावर गेली. यात शहरात एक हजार १७२ बाधित आढळून आले आहेत. बाधितांचा १ हजार ३९३ चा आकडा बघताच जिल्हा प्रशासनाने मिनी लॉकडाऊनमध्ये आठवडाभर वाढ केली. दरम्यान, गेल्या चोवीस तासांमध्ये ९ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली असून यात शहरातील सर्वाधिक पाच जणांचा समावेश आहे.

मागील पंधरवड्यात २४, २५ व २६ फेब्रुवारीला सलग तीन दिवस अकराशे रुग्ण आढळले होते. त्यानंतर मागील आठवड्यात बाधितांचा आलेख काही प्रमाणात खाली आला होता. परंतु, आज बाधितांचा आकडा १ हजार ३९३ पर्यंत पोहोचल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली असून दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा - नोकरीची हमी अन् ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’; रोजगार सेवकांचा मनमानी कारभार; तरुणांची...

मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू असतानाच बाधितांच्या वाढत्या संख्येने प्रशासनावर दुहेरी ताण पडत असल्याचे चित्र आहे. आज आढळून आलेल्या एकूण बाधितांपैकी १ हजार १७२ शहरातील आहेत. ग्रामीण भागातील २१९ बाधित असून शहराबाहेरील दोघांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या १ लाख ५५ हजार २७५ पर्यंत पोहोचली. यात शहरातील बाधितांची संख्या १ लाख २४ हजारांपर्यंत पोहोचली. 

ग्रामीण भागातील एकूण बाधितांची संख्या ३० हजार ४१९ पर्यंत पोहोचली. दरम्यान, गेल्या चोवीस तासांमध्ये ९ कोरोनाबळींची नोंद करण्यात झाली आहे. यात शहरातील सर्वाधिक ५ जणांचा तर ग्रामीणमधील २ दोन जणांचा समावेश आहे. शहराबाहेरील दोघांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, आज ११ हजार ५०८ चाचण्यांचा अहवाल आला. त्यातून १ हजार ३९३ बाधित आढळून आले. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याने जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९०.४६ पर्यंत खाली आहे. आज ५८३ कोरोनाबाधित बरे झाले असून एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ४० हजार ४६९ आहे.

आठवडाभरात सहा हजारांवर बाधित

गेल्या आठवडाभरात सहा हजार ३८६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. मागील आठवड्यात २७ फेब्रुवारीला बाधितांची एकूण संख्या १ लाख ४८ हजार ८८९ होती. आता ही संख्या १ लाख ५५ हजार २७५ पर्यंत गेली. अर्थात दररोज सरासरी ९१२ पेक्षा जास्त बाधित आढळून येत आहे.

हेही वाचा - अनधिकृत बांधकामधारकांसाठी महत्वाची बातमी, २०२०...

सक्रिय रुग्ण दहा हजारांवर

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. काल साडेनऊ हजार असलेली सक्रिय रुग्णांची संख्या आज १० हजार ४३२ पर्यंत पोहोचली. एका दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या ८०१ ने वाढली. साडेदहा हजार सक्रिय रुग्णांपैकी साडेसात हजार रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.