नोकरीची हमी अन् ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’; रोजगार सेवकांचा मनमानी कारभार; तरुणांची लूट 

संदीप गौरखेडे
Friday, 5 March 2021

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम २००५ अंतर्गत गरीब कुटुंबातील व्यक्तीचे जॉबकार्ड तयार करून त्यांना रोजगार दिला जाते. वर्षातून शंभर दिवस केंद्र सरकारकडून त्यांना कामाची हमी दिल्या जाते, तर उर्वरित दिवस राज्य सरकार मजुरांना काम देत असते.

कोदामेंढी(मौदा) (जि. नागपूर) : रोजगार हमीच्या कामात पारदर्शकता असावी, याकरिता शासनाने बऱ्याच सुधारणा केल्या. मजुरांची मजुरी डीबीटी पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यात जमा केली जाते. मात्र यातही शक्कल लढवीत मजुराच्या मजुरीवर डल्ला मारला जात आहे. ‘रोजगार हमी अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही’ असा प्रकार मौदा तालुक्यातील धर्मापुरी ग्रामपंचायत येथे सुरु असल्याचे पुढे आले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम २००५ अंतर्गत गरीब कुटुंबातील व्यक्तीचे जॉबकार्ड तयार करून त्यांना रोजगार दिला जाते. वर्षातून शंभर दिवस केंद्र सरकारकडून त्यांना कामाची हमी दिल्या जाते, तर उर्वरित दिवस राज्य सरकार मजुरांना काम देत असते. याकरिता प्रति दिवस २३८ रुपये मजुरी ठरवून दिलेली आहे. मात्र धर्मापुरी येथील ग्रामपंचायतीमध्ये मजुरांवर अन्याय होत असून त्यांच्या मजुरीवर रोजगारसेवक डल्ला मारीत असल्याचे पुढे आले आहे. 

हेही वाचा - नागपूरकरांनो, विनाकारण घराबाहेर पडताना १० वेळा विचार करा; सलग दुसऱ्या दिवशी हजारावर कोरोना बाधित

रोजगारसेवक, ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे ऑपरेटर आपसात साठगाठ करीत मलिंदा लाटत असतात. धर्मापुरी येथे एक रोजगारसेवक कार्यरत आहे. त्यांचा मनमानी कारभार आणि मजुरांवर होत असलेला अन्याय पाहून धसका बसण्यासारखा आहे. शासनाच्या पारदर्षी योजनेला गालबोट लावण्याचे काम केले असून याला ग्रामसेवकाची साथ असल्याशिवाय करण्यासारखे नाही. रोजगार हमीच्या मजुरांना स्वतःच्या शेतात, प्लॉटवर, नाल्याची साफसफाई आणि बांधकामाच्या ठिकाणी राबविली जाते. 

मजुराने न ऐकल्यास मस्टरहून नाव कमी करण्याची धमकी दिली जाते. दुपारहून अर्धे काम करून एखादा मजूर गेल्यास आणि कामावर न आलेल्या मजुराची हजेरी लावल्या जाते. मस्टरमध्ये बोगस मजुराची संख्या दाखवून पैशाची उचल केली जाते. बँक खात्यात पैसे जमा झाल्यास त्यांच्याकडून प्रति दिवस १५० रुपये प्रमाणे वसूल केले जातात. अशाप्रकारे महिन्याकाठी हजारो रुपयाचा गोरखधंदा केला जात आहे.

'मागेल त्याला काम' असे रोजगार हमी योजनेचे ब्रीद आहे. मात्र येथील नरेंद्र वाहाणे याला काम देण्यास रोजगार सेवक आणि ग्रामसेवकाने नकार दिल्याने मोठे घबाड पुढे आले आहे. बेरोजगारी आणि त्यातच कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. नरेंद्र वाहाणे हे बीएससी, बीएड. असून ते रोजगारासाठी फिरकतात. 

कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी त्याने रोजगार हमीच्या कामावर जाण्याची इच्छा दर्शविली, मात्र त्याला कामावर घेण्यास नकार दिल्याने त्याने माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागितली असता मोठा गैरव्यवहार केल्याचे कळते. महिला मजूर कामावर नसताना देखील त्यांची नावे, बोगस मजूर आणि कधीकाळी कामावर येणाऱ्या मजुराची पूर्ण हजेरी लावून पैसे त्यांच्या बँक खात्यात वळती केले जातात. त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यास ‘अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही’ यानुसार कामकाज सुरु आहे.

दबावतंत्राचा वापर 

नरेंद्र वाहाणे यांनी मनरेगाच्या कामात गोरखधंदा सुरु असल्याची तक्रार खंडविकास अधिकारी यांच्याकडे केली आणि माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागितली. त्यामुळे आपले बिंग फुटेल या भीतीने ग्रामसेवक, सरपंच यांनी चौकशीच्या नावाखाली गावातील काही नेतेमंडळीला बोलाविले. यात गावची बदनामी होईल. नरेगाची पुढील कामे अडचणीत येतील, अशी धमकीवजा देत माहितीचा अधिकाराचा दुरुपयोग करीत असल्याचा टोला मारीत लाखोंचा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र घोटाळा करणाऱ्याची पाठराखण केली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हेही वाचा - थरार! मुलीला शून्य गुण का दिले म्हणून महाविद्यलयात...

प्रथम धर्मापुरी येथील प्रकरणाची तपासणी करतो. तसेच जो दोषी असेल त्याच्याविरूध्द कारवाई करण्यात येईल. कुणालाही सोडले जाणार नाही.
दयाराम राठोड, 
खंडविकास अधिकारी, पंचायत समिती मौदा

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment servants are taking half money from candidates to give them job