बापरे, नगरसेवकांमुळे वाढणार कोरोना धोका !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

महापालिकेच्या सचिवालयाने येत्या 20 जून रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासंदर्भात विषय पत्रिका काढली. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या तीन महिन्यानंतर प्रथमच सभेचे आयोजन करण्यात आले. लॉकडाऊनच्या नियमानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी दोन हजार आसन व्यवस्था असलेल्या सुरेश भट सभागृह सभेसाठी निश्‍चित करण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षासह इतर पक्षाच्या सदस्यांतही प्रभागातील नागरिकांच्या समस्या मांडण्याबाबत उत्सुकता होती.

नागपूर :  गेल्या तीन महिन्यानंतर येत्या 20 जून रोजी प्रस्तावित महापालिकेची सर्वसाधारण सभा रद्द करण्यासंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौर संदीप जोशी यांना विनंती केली. शहरात विविध परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून परिसर प्रतिबंधित क्षेत्र आहे. अनेक नगरसेवक या परिसरात वास्तव्यास असून सभेत ते आल्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती आयुक्त मुंढे यांनी व्यक्त केली. आयुक्तांच्या पत्रावर महापौर संदीप जोशी सभेबाबत आज निर्णय घेणार आहेत. 

महापालिकेच्या सचिवालयाने येत्या 20 जून रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासंदर्भात विषय पत्रिका काढली. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या तीन महिन्यानंतर प्रथमच सभेचे आयोजन करण्यात आले. लॉकडाऊनच्या नियमानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी दोन हजार आसन व्यवस्था असलेल्या सुरेश भट सभागृह सभेसाठी निश्‍चित करण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षासह इतर पक्षाच्या सदस्यांतही प्रभागातील नागरिकांच्या समस्या मांडण्याबाबत उत्सुकता होती. 

सर्व गटनेते, विरोधी पक्ष व सदस्यांसह चर्चेनंतर महापौर संदीप जोशी यांनी सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असेम्बली हॉल व तत्सम जागा प्रतिबंधित यादीत असल्याने सभा घेणे योग्य नसल्याचे पत्राद्वारे महापौर संदीप जोशी यांना कळविले. सभा घेतल्यास ही कृती राज्य शासनाच्या आदेशाची अवहेलना ठरणारी तसेच बेकायदेशीर ठरणार असल्याची पुस्तीही आयुक्तांनी जोडली. 

पावसाळा आला अन्‌ मानकापूरसाठी धोक्‍याची घंटा घेऊन आला, वाचा काय आहे प्रकार..

शहरात विविध भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्याचे क्षेत्र प्रतिबंधित केले आहे. या क्षेत्रात अनेक पदाधिकारी, सदस्यांचेही वास्तव्य आहे. हे सदस्य सभेत सहभागी झाल्यास कोरोना विषाणूचे संक्रमण वाढण्याची भीतीही आयुक्तांनी व्यक्त केली. सदस्य, अधिकारी मोठ्या संख्येने एकत्र येणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने संयुक्तिक नाही, असे नमुद करीत आयुक्तांनी सर्वसाधारण सभा रद्द करण्याच्या आवश्‍यकतेवर भर दिला. याबाबत महापौरांच्या स्तरावरून कार्यवाही करण्याची विनंतीही त्यांनी केली. त्यामुळे 20 जून रोजी होणाऱ्या सभेचे भवितव्य अधांतरी आहे. 

आयुक्त व प्रशासनात समन्वयाचा अभाव 
महापालिका सभेची विषय पत्रिका सचिवालय कार्यालयाने काढली. अर्थात आयुक्त प्रमुख असल्याने त्यांना सभेची माहिती देणे क्रमप्राप्त आहे. आयुक्तांनी महापौरांना सभा रद्द करण्याबाबत पाठविलेल्या पत्रातून ते सभेबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. त्यामुळे सचिवालय व आयुक्त यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे अधोरेखित झाले. 

विरोधी पक्षनेते, सर्वपक्षीय गटनेते यांच्यासोबत चर्चा करून सर्वसाधारण सभा घेण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार सचिवालयाने विषय पत्रिकाही काढली. आज आयुक्तांनी दिलेल्या पत्रामुळे उद्या, मंगळवारी विरोधी पक्षनेते, सर्वपक्षीय गटनेत्यांसोबत चर्चा करून सभेबाबत निर्णय घेणार आहे. 
- संदीप जोशी, महापौर.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona threat will increase due to corporators !