नगरसेवकांच्या प्रश्‍नांवर तुकाराम मुंढे झाले निरुत्तर, दिली ही ग्वाही...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जून 2020

संतप्त नगरसेवकांना उत्तर देताना आयुक्तांनी शांतपणे प्रत्येक निर्णय जनतेच्या हितासाठी आणि शासनाच्या वेळोवेळी आलेल्या दिशानिर्देशानुसारच घेण्यात आल्याचे सांगितले. नागरिकांचे विलगीकरण केल्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करता आली. त्यामुळेच सध्या नागपूरचा रिकव्हरी रेट चांगला असा दावाही त्यांनी केला. शासनाकडून आलेल्या निधीचा वापर दिशानिर्देशानुसारच करण्यात आला. यापुढे प्रत्येक निर्णयांची माहिती लोकप्रतिनिधींना देण्यात येईल, असे नमूद करीत त्यांनी एका पाऊल मागे घेतले.

नागपूर : आतापर्यंतच्या लॉकडाउनच्या काळात विविध निर्णयापासून महापौर, नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांना लांब ठेवणाऱ्या आयुक्तांवर गुरुवारी सारेच संतापले. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शांत व संयमपणे बाजू हाताळली. त्यांनी यापुढे लोकप्रतिनिधींना प्रत्येक निर्णयाची कल्पना देण्याची ग्वाही दिली. नगरसेवकांच्या काही प्रश्‍नांवर ते निरुत्तर झाले तर काही चुका मान्य करीत पुढील काळात लोकप्रतिनिधी व प्रशासन एकत्र येऊन काम करण्याचे संकेत दिले.

शहरातील सद्यस्थितीबाबत महापालिकेत गुरुवारी महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत महापौर संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक तथा आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती विजय झलके, सत्तापक्षनेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त तुकाराम मुंढे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, बसपच्या गटनेत्या वैशाली नारनवरे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती अभय गोटेकर यांच्यासह मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, राकॉंचे गटनेते दुनेश्वर पेठे यांनी प्रशासन नगरसेवकांसोबत समन्वयाने वागत नसल्याचे सांगितले. कोरोनाच्या काळात प्रशासनाने नगरसेवकांना सोबत घेतले नाही, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केली. विलगीकरण केंद्रातील जेवणावरून आमदार प्रवीण दटके यांनी प्रशासनाच्या निर्णयांवर रोष व्यक्त केला. विलगीकरण केंद्रात चांगल्या सोयी दिल्या तर लोकं स्वत:हून विलगीकरण केंद्रात येण्यास तयार झाले असते, असे ते म्हणाले.

संतप्त नगरसेवकांना उत्तर देताना आयुक्तांनी शांतपणे प्रत्येक निर्णय जनतेच्या हितासाठी आणि शासनाच्या वेळोवेळी आलेल्या दिशानिर्देशानुसारच घेण्यात आल्याचे सांगितले. नागरिकांचे विलगीकरण केल्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करता आली. त्यामुळेच सध्या नागपूरचा रिकव्हरी रेट चांगला असा दावाही त्यांनी केला. शासनाकडून आलेल्या निधीचा वापर दिशानिर्देशानुसारच करण्यात आला. यापुढे प्रत्येक निर्णयांची माहिती लोकप्रतिनिधींना देण्यात येईल, असे नमूद करीत त्यांनी एका पाऊल मागे घेतले.

नगरसेवकांना विश्‍वास घेऊन कामे करा

दोन महिन्यांच्या काळात महापौरांसह कुणालाही मनपा प्रशासनाने माहिती दिली नाही. यापुढे नगरसेवकांना विश्वासात घेऊन कामे करावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी आयुक्तांना दिले. पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी नगरसेवकांना निधी वापरण्यास परवानगी द्यावी. प्रशासनाच्या सर्व निर्णयांची प्रत महापौर कार्यालयाला पाठवा. गांधीनगर रुग्णालयाची माहिती तीन दिवसांत द्या, असेही निर्देश त्यांनी दिले.

अवश्य वाचा- नागपुरात विवाहासाठी आता फक्त २७ हजारांचे पॅकेज...खर्च कमी, सुरक्षेची हमी

नगरसेवकावर गुन्हा, आयुक्त निरुत्तर

सतरंजीपुरा झोनमधील नगरसेवक नितीन साठवणे यांच्यावर गुन्हा दाखल करणे योग्य नव्हते, याकडे प्रफुल्ल गुडधे यांनी लक्ष वेधले. आयुक्तांनी मात्र पर्यायच नव्हता, असे उत्तर दिले. गुडधे यांनी याबाबत महापौरांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा पर्याय होता. परंतु, त्याबाबत विचारच केला गेला नाही, असे सांगितले. यावर आयुक्त मुंढे निरुत्तर झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporator got angry on Tukaram Mundhe