esakal | अंत्योदय योजनेच्या धान्य वाटपात घोळ
sakal

बोलून बातमी शोधा

antyoday.

तास येथील महिला बचत गटाकडून शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. गरीब, अशिक्षित कुटुंबांच्या अज्ञानाचा फायदा उचलून अंत्योदय योजनेद्वारे मिळणाऱ्या ३५ किलो धान्यापैकी केवळ पाचच किलो धान्य काही कुटुंबाना दिले जात आहे.

अंत्योदय योजनेच्या धान्य वाटपात घोळ

sakal_logo
By
अमर मोकाशी

 भिवापूर : तास येथे अंत्योदय अन्न योजनेच्या माध्यमातून मिळणारे धान्य लाभार्थ्यांना न देता रेशन दुकानचालक ते इतरत्र विकत असल्याचे प्रकरण नुकतेच प्रकाशात आले आहे. हा प्रकार मागील दोन वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू आहे. विशेष म्हणजे हे दुकान गावातीलच महिला बचत गटाकडून चालविले जात असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अत्यल्प उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांना अंत्योदय अन्न योजनेच्या माध्यमातून शासन दर महिन्याला प्रती दोन व तीन रुपये किलो दराने २० किलो गहु व १५ किलो धान्य पुरविते. कोणीही गरीब अन्नावाचून राहु नये, हा त्यामागील उद्देश आहे. परंतु तास येथील महिला बचत गटाकडून शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. गरीब, अशिक्षित कुटुंबांच्या अज्ञानाचा फायदा उचलून अंत्योदय योजनेद्वारे मिळणाऱ्या ३५ किलो धान्यापैकी केवळ पाचच किलो धान्य काही कुटुंबाना दिले जात आहे. उरलेले ३० किलो धान्य इतरत्र विकून दुकानचालक मालामाल होत आहेत. पीसाबाई अमृत मोटघरे, मालन सुदाम पाटील, देवकाबाई अर्जुन श्रीरामे (सर्व रा.तास) या ग्रामस्थांचे नाव अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये समाविष्ट आहेत. मात्र त्यांना प्रत्येक महिन्याला ३५ ऐवजी केवळ ५ किलो धान्य देण्यात येते. त्यांच्या शिधापत्रिकेतही ५ किलो धान्याची उचल केल्याची नोंद दुकानचालकांकडून करण्यात येते. थंब मशीनमधून निघणाऱ्या पावत्या ( बील ) मात्र त्यांना दिल्या जात नाही. हा प्रकार मागील अडीच वर्षांपासून सुरू आहे.

असा झाला भंडाफोड
तासचे माजी सरपंच युवराज शंभरकर यांना संशय आल्याने त्यांनी इंटरनेटवर गावातील काही गरीब कुटुंबांच्या ई पासेसची तपासणी केली. तेव्हा अंत्योदय योजनेत सुरू असलेला वरील गैरप्रकार समोर आला.

चौकशी व कारवाईची मागणी
तास येथे एकूण ११४ लाभार्थ्यांचे नाव अंत्योदय योजनेत समाविष्ट आहेत. त्यापैकी तीन लाभार्थ्यांना योजनेचे पूर्ण धान्य दिले गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संख्या मोठी असण्याची शक्यता असून त्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी सरपंच युवराज शंभरकर यांनी केली आहे. मागणीचे निवेदन शंभरकर यांनी सोमवारी आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिले.