मला एकटं सोडू नका प्लीज... घुसमट वाढताहे? यांच्याशी बोला

file photo
file photo

नागपूर : तणावपूर्ण परिस्थितीत असणाऱ्या व्यक्ती लॉकडाउनमुळे आणखी एकट्या पडल्या आहेत. कुणाचे निकटवर्तीय कायमचे दुरावले आहेत. कुणाला जगण्याची भ्रांत निर्माण झालीय. लॉकडाउनच्या दोन महिन्यांत अशा अनेक कठीण प्रसंगांत अडकलेल्या नागरिकांना समुपदेशन करण्यासाठी काही तरुण तरुणींनी एकत्रित येत "घुसमट मनाची, हितगुज आमच्याशी' हा मानसिक आरोग्यासाठीचा उपक्रम प्रत्यक्षात आणला. याद्वारे अनेकांना मनाच्या द्वंद्वातून बाहेर काढता आले आहे. 

तिशीतील तरुणी, जिचे बालपण लहान भावंडाचा सांभाळ करण्यात गेले. घरची मोठी मुलगी. आईवडिलांची रोजची भांडणं. त्यामुळे कमी वयातच समंजस झाली. लग्न झाले, पण नवऱ्याकडून प्रेमाऐवजी अवहेलना मिळाली. काही काळातच घटस्फोट घेऊन माहेरी परतली. घरच्यांसाठी आधीच परकी झालेली ती आपले अस्तित्व शोधू लागली. त्यात वडील गेले. आईला मानसिक व्याधी जडल्या. यावेळी हीच मुलगी आधार वाटू लागली. नोकरी करून, लहान भावंडांचा आणि आईचा सांभाळ करू लागली. पण, लॉकडाउनमुळे तिची नोकरी गेली. आवक बंद झाली. घरात अनेक समस्या आ-वासून उभ्या होत्या. यातच तिला आलेला एकाकीपणा आणि भूतकाळातील कटू आठवणींमुळे जीवन नकोसे वाटू लागले. अशातच लॉकडाउनमध्ये समुपदेशन सुरू केलेल्या "हितगुज'च्या टीमचा नंबर तिला मिळाल्याने त्यांच्याजवळच ती मोकळी झाली. धाय मोकलून रडली... आपल्यातच काही कमी आहे या भावनेने तिला घेरले असल्याचे समुपदेशकांना उमगले. त्यातून तिला बाहेर काढण्यात आता यश आले आहे. 

विशीतला तरुण वडील अपघातात गेले. पाठोपाठ आईही आजारपणात गेली. याला नैराश्‍याने घेरले त्यामुळे प्रेयसीही कंटाळून सोडून गेली. याला आता नैराश्‍याने चारही बाजूंनी आपल्या कवेत घेतले. "हितगुज'ला फोन करून घडाघडा बोलला. मला एकटे सोडू नका प्लीज... ही त्याची भावनिक साद हितगुजच्या टीमला ही हतबल करणारी होती... सतत धावणाऱ्या मोठ्या शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी आणि मोठी स्वप्ने पाहणारी महत्त्वाकांक्षी तरुणी लॉकडाउनमुळे गावी आली.

सुरुवातीला दोन आठवडे अत्यंत आनंदात गेले. नंतर घरून लग्नासाठी आग्रह सुरू झाला. आईवडिलांचे भावनिक आवाहन. जीव देण्याची धमकी. यामुळे तिची स्वप्नं, तिच्या महत्त्वाकांक्षा आणि कुटुंब या गुंत्यात तिचा जीव गुदमरायला लागला. आत्महत्या करण्यापूर्वी एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून मध्यरात्री हितगुजच्या टीमला कॉल केला. या कॉलने तिला नव्याने स्वप्न पाहायला शिकवले. लॉकडाउन सुटल्यावर तुझे प्रश्‍नही सैल होतील आणि पुन्हा एकदा आपल्या स्वप्नांच्या दिशेने भरारी घेता येईल, हा विश्‍वास तिच्यात जागविता आल्याचे समाधान समुपदेशकांनी या काळात अनुभवले. 

घुसमट मनाची, हितगुज आमच्याशी! 
'घुसमट मनाची, हितगुज आमच्याशी' हा उपक्रम पीयूष हेरोडे, ऋचा बागडे, अक्षय ठाकरे आणि श्रद्धा देसाई या चौघांनी सुरू केला. हे चौघे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे विद्यार्थी असून, त्यांनी राज्यभरात समुपदेशनाचा यशस्वी प्रयोग केला. यात त्यांनी विविध मानसोपचारतज्ज्ञ, मार्गदर्शक, समाजसेवक यांची मदत घेऊन, शेकडो मनांची घुसमट दूर केली. दोन महिन्यांच्या काळात त्यांना तब्बल 123 कॉल आणि शेकडो मॅसेज आल्याचे उपक्रमातील अक्षय ठाकरे यांनी सांगितले. 

गेल्या दोन महिन्यांत आमच्या टीमला 123 कॉल, असंख्य फेसबुक मॅसेजेस आलेत. काही वेळा अगदी मध्यरात्रीही आम्हाला कॉल येतात. काही वेळा सगळ्यांसमोर बोलता येत नसल्याने लपूनछपून मदतीसाठी कॉल केले जातात. यात एकटेपणा, नातेसंबंधात होणारी भांडणे, नैराश्‍य, कोराना संदर्भात वाटणारी भीती हे विषय होते. सोबत घरगुती हिंसाचार सहन करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण लक्षणीय आहे. 
-ऋचा बागडे, समुपदेशक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com