तुकाराम मुंढेंना न्यायालयाचे आदेश, बकरामंडी त्वरीत स्थलांतरीत करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

वाठोड्यातील जागा क्वारंटाईन सेंटर असलेल्या सिम्बॉयसिस कॉलेजजवळ आहे. बकरामंडी वाठोड्यात स्थानांतरित केल्यास या भागात कोरोना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

नागपूर : मोमीनपुऱ्यातील बकरामंडी तात्काळ कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात स्थलांतरित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिका आयुक्तांना दिले. महानगरपालिका उपायुक्तांनी 4 मे रोजी वादग्रस्त आदेश जारी करून ही बकरामंडी वाठोडा येथे स्थानांतरित केली होती. त्याविरुद्ध उमेश उतखेडे, कृष्णा मस्के व दिनेश येवले यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
याचिकेनुसार, मोमीनपुरा येथे कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे, महानगरपालिका आयुक्तांनी 12 एप्रिल रोजीच्या आदेशाद्वारे मोमीनपुऱ्याला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. परिणामी, या क्षेत्रातील नागरिक बाहेर जाऊ शकत नाहीत व बाहेरचे नागरिक या क्षेत्रात प्रवेश करू शकत नाहीत. असे असताना मोमीनपुऱ्यातील बकरामंडी वाठोड्यात स्थानांतरित करण्यात आली. महापालिका उपायुक्तांचा आदेश महापालिका आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करणारा आहे. वाठोड्यातील जागा क्वारंटाईन सेंटर असलेल्या सिम्बॉयसिस कॉलेजजवळ आहे. बकरामंडी वाठोड्यात स्थानांतरित केल्यास या भागात कोरोना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

सविस्तर वाचा - वेळ रात्री अकराची...युवतीसोबत रस्त्यावर बोलत होता पोलिस कर्मचारी...मग काय झाले वाचा...

उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वाठोड्यातील नागरिकांना दिलासा देऊन याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. कार्तिक शुकुल यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणी न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court orders to shift goat market