कोरोना लस : ५५ व्यक्तींवरील निरीक्षण सकारात्मक; आता दुसरा टप्पा, या शहरातील चाचण्यांकडे लक्ष

केवल जीवनतारे
Monday, 10 August 2020

पहिल्या टप्प्यात २०, २२ आणि ३२ वर्षीय युवकांसह ५३ वर्षीय महिलेस १४ दिवसांपूर्वी कोव्हॅक्‍सिन लशीचा पहिला डोस दिला होता. आता दुसरा डोस देण्यात येणार आहे. १४ दिवसांमध्ये कोणालाही रिॲक्‍शन आली नाही. यांच्या रक्ताचा अहवाल दिल्ली येथे सेंट्रल लॅबकडे पाठवण्यात आला आहे.

नागपूर  : भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोव्हॅक्‍सिन लशीची क्‍लिनिकल ट्रायल नागपूरच्या गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २७ जुलै रोजी सुरू झाली. त्यानंतर सात दिवसांत ५५ स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली. मंगळवारी सात जणांना क्‍लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यातील डोस देण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात २०, २२ आणि ३२ वर्षीय युवकांसह ५३ वर्षीय महिलेस १४ दिवसांपूर्वी कोव्हॅक्‍सिन लशीचा पहिला डोस दिला होता. आता दुसरा डोस देण्यात येणार आहे. १४ दिवसांमध्ये कोणालाही रिॲक्‍शन आली नाही. यांच्या रक्ताचा अहवाल दिल्ली येथे सेंट्रल लॅबकडे पाठवण्यात आला आहे. पहिला डोस दिलेल्या सात जणांना मंगळवारी दुसरा डोस देण्यात येईल. दरम्यान, या लशीचे पहिल्या टप्प्यातील ५५ व्यक्तींवरील निरीक्षणही सकारात्मक दिसत आहे. त्यामुळे आता नागपूरच्या चाचण्यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अधिक माहितीसाठी - नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा
 

देशातील एकूण १२ केंद्रांवर या चाचण्या होत आहेत. ५५ व्यक्तींना लस दिल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे. या ५५ जणांना आणखी २८ दिवसांनंतरचा डोस देण्यात येणार आहे. पुढे ४२, १०४ आणि १९४ व्या दिवशी लस टोचण्यात येईल. प्रत्येकाच्या रक्ताची चाचणी करून ॲन्टिबॉडीची तपासणी होत आहे, अशी माहिती गिल्लूरकर रुग्णालयाचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दिली.

 
कुणावरही दुष्परिणाम नाही
कोव्हॅक्‍सिन लशीच्या प्री-क्‍लिनिकल ट्रायलला १४ दिवसांपूर्वी प्रारंभ झाला. यातील सात जणांना मंगळवारी दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या लस दिल्लीवरून आल्या आहेत. पहिल्या डोसचा कुणावरही दुष्परिणाम दिसून आला नाही. सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसचा असाच सकारात्मक परिणाम येण्याची शक्यता अधिक आहे.
-डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, संचालक, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covacin will give a second dose of the vaccine, the first phase observation positive