लसींचा तुटवडा! नागपूरातील मेडिकलमध्ये संपल्या कोव्हॅक्सिन लस; कोविशिल्डचाही दोन दिवस पुरेल इतकाच साठा 

केवल जीवनतारे 
Thursday, 8 April 2021

मेडिकलमधील कोव्हॅक्सिनचा साठा संपला. नव्याने लसीकरणासाठी येणाऱ्यांना लस देता आले नाही. उर्वरित केंद्रावर दोन दिवस पुरेल येवढाच कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध आहे.

नागपूर ः केंद्र व राज्य शासनाकडून कोरोना नियंत्रणासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीकरणावर भर दिला आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात पाच केंद्रावर लावण्यात येणारी कोव्हॅक्सिन लस संपली. यामुळे एका दिवसात सुमारे चारशेवर व्यक्तींना आल्या पावली परत जावे लागले. मेडिकलमध्ये पुढील दोन दिवस पुरेल कोव्हॅक्सिनचा साठा होता. परंतु एका फोनमुळे मेडिकलमधील कोव्हॅक्सिन लस महापालिकेच्या महाल केंद्रात वळत्या करण्यात आल्या. यामुळे मेडिकलमधील कोव्हॅक्सिनचा साठा संपला. नव्याने लसीकरणासाठी येणाऱ्यांना लस देता आले नाही. उर्वरित केंद्रावर दोन दिवस पुरेल येवढाच कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध आहे.

पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यासह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी मागील तीन महिन्यात आतापर्यंत १२ लाख ५४ हजार ४०० कोविशिल्ड तर १ लाख ७५ हजार १६० कोव्हॅक्सिन लसी प्राप्त झाल्या. नागपूरच्या मेडिकलसहित शहरातील पाच केंद्रावर कोव्हॅक्सिन लस देण्यात येते. चार दिवसांपूर्वी उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील कोव्हॅक्सिन लस संपली. 

नागपुरात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक संसर्ग! एकाच दिवशी तब्बल ५ हजार ३३८ पॉझिटिव्ह; तर ६६ जणांचा मृत्यू 

केवळ मेडिकलमध्ये १ हजार कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होत्या. मात्र एका फोनवरून या लसी महापालिकेच्या स्व. प्रभाकरराव दटके रुग्णालयात वळत्या करण्यात आल्या. यामुळे मेडिकलमध्ये उपलब्ध साठा संपला. बुधवारी (ता.७) आरोग्य दिनाच्या पर्वावर लसीकरणासाठी येणाऱ्या सर्वांनाच दोन दिवसानंतर या, असे सांगण्यात येत आहे. केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी पाच ते दहा वायल उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोविशिल्ड दोन दिवस पुरेल येवढाच साठा

पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यात पुढील दोन दिवस पुरेल येवढाच कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध आहे. नागपूर जिल्ह्यात दर दिवसाला सरासरीने २५ हजार व्यक्तींचे लसीकरण होते. या सरासरीने लसीकरण झाल्यास नागपुरात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल येवढाच साठा नागपूर जिल्ह्यात आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्येदेखील हीच स्थिती आहे. अवघ्या दोन लाख डोस शिल्लक असून दोन दिवसात हे डोस संपतील असे सूत्रांनी सांगितले.

बाप रे बाप! साडे आठ तोळे सोनं आणि अर्धा किलो चांदी लंपास; तब्बल 3 लाख 62 हजारांची घरफोडी

५५ हजार कोव्हॅक्सिन पोहचणार

नागपूर जिल्ह्यात पूर्वी मेडिकल या एकाच केंद्रावर कोव्हॅक्सिन लस दिली जात होती. परंतु नागरिकांनी कोव्हॅक्सिनला पसंती दिल्यामुळे मेडिकलमध्ये गर्दी वाढली होती. यामुळे शहरात पाच कोव्हॅक्सिनचे लसीकरण केंद्र तयार करण्यात आले. आतापर्यंत पूर्व विदर्भात पावणेदोन लाख कोव्हॅक्सिन लसीचे डोस नागरिकांना दिल्या आहेत. आता कोव्हॅक्सिन संपल्या असून दोन दिवसात ५५ हजार कोव्हॅक्सिन वायल येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covaxin is not available in medical Nagpur Covishield also in less numbers