वानाडोंगरीत ग्रामीण भागातील पहिलेच कोविड केअर सेंटर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहात जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. या सेंटरमध्ये विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली.

हिंगणा (नागपूर) : जिल्ह्यातील ग्रामीण भागात हिंगणा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 71 झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार वानाडोंगरी येथे कोविड केअर सेंटर साकारण्यात आले आहे. या केंद्रात विलगीकरण कक्षासह नमुने तपासणीचे काम प्रारंभ करण्यात आले आहे. 

एमआयडीसी परिसरातील लोकमान्य नगर परिसरापासून कोरोनाचा प्रारंभ झाला. गजानननगर, पारधी नगर, इसासनीमधील भीमनगर, निलडोहमधील अमरनगर, वानाडोंगरीतील साईराम चौक, राजीवनगर व शिक्षक कॉलनी परिसरात 19 जूनपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आढावा घेतला. वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहात जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. या सेंटरमध्ये विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे व तालुका कोविड केअर समितीचे सचिव उपविभागीय अभियंता जे. के. राव यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने अद्ययावत कोविड केअर सेंटर तयार केले. 

नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील पहिले कोविड केअर सेंटर असून, रक्त तपासणी व इतर तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालय व रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांना या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांतून येणाऱ्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. 

अमरनगर व भीमनगर या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात कोरोनाने पाय पसरविणे सुरू केले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांची डोकेदुखी वाढली आहे. हिंगणा एमआयडीसी परिसरात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी तालुका आरोग्य विभागातील कर्मचारी सातत्याने धडपड करीत आहेत. मात्र, सर्वसामान्य जनता आता बिनधास्तपणे वावरू लागल्याने पुन्हा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा : तरुणीचा फोन येताच गंतव्यस्थळ गाठले, पण पुढे घडला हा प्रकार...

एमआयडीसीच्या लॉकडाउनची मागणी 
हिंगणा एमआयडीसी कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. उद्योगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. तालुका प्रशासनाने एका कंपनीवर कारवाई केली. भविष्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास तालुका प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. यामुळे किमान एक आठवडा एमआयडीसी परिसरात लॉकडाउन घोषित करावा, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची आमदार समीर मेघे यांनी भेट घेतली. याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid care center in Wanadongari