तपासणी अहवालास विलंबामुळे फिरते कोविड चाचणी केंद्र कुचकामी!

राजेश प्रायकर
Wednesday, 7 October 2020

आता शहरात एकूण १४ फिरते कोविड चाचणी केंद्र नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध आहेत. यासाठी ‘आपली बस’ सेवेतील मिनी बसमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे. कोविड चाचणी केंद्रामधून एकावेळी दोन जणांची चाचणी केली जात आहे. यासाठी बसमध्ये दोन डॉक्टर, एक नर्स आणि एक स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. बसमधून रुग्ण आणि डॉक्टरांचा प्रत्यक्ष संपर्क न येता आरटीपीसीआर चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपूर : फिरत्या कोविड चाचणी केंद्रात चाचणी केल्यानंतर नमुने तपासणी अहवाल कधी येईल? याचा काहीच नेम नाही. तपासणी अहवाल किती दिवसांत मिळायला हवा, याबाबत कुठलाही विचार केला गेला नसल्याने नागरिकांना तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी रुग्ण बाधित निघाल्यास तत्काळ उपचाराच्या हेतूलाच सुरुंग लागल्याचे चित्र आहे.

महापालिकेने शहरात ५५ निःशुल्क कोविड चाचणी केंद्र सुरू केले. हे केंद्रही घरापासून लांब असल्याने नागरिक कोविड चाचणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पुढे आले. त्यामुळे चाचणीच्या प्रमाणातही घट झाली होती. नागरिकांना घराजवळच कोविड चाचणीची सुविधा मिळावी, या चांगल्या हेतूने महापालिकेने फिरते चाचणी केंद्र सुरू केले.

सुरुवातीला पालिकेने एका रुग्णवाहिकेमध्ये फिरते चाचणी केंद्र केले. त्यानंतर प्रभावती ओझा स्मृती फिरते कोविड चाचणी केंद्र रामकिशन ओझा यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आले. आता परिवहन विभागाच्या सहकार्याने यात १२ फिरत्या केंद्रांची भर पडली आहे. आता शहरात एकूण १४ फिरते कोविड चाचणी केंद्र नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध आहेत.

यासाठी ‘आपली बस’ सेवेतील मिनी बसमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे. कोविड चाचणी केंद्रामधून एकावेळी दोन जणांची चाचणी केली जात आहे. यासाठी बसमध्ये दोन डॉक्टर, एक नर्स आणि एक स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. बसमधून रुग्ण आणि डॉक्टरांचा प्रत्यक्ष संपर्क न येता आरटीपीसीआर चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या प्रत्येक झोनमध्ये एक बस उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकही चाचणीसाठी पुढे येत आहेत.

परंतु चाचणी केल्यानंतर नागरिकांना तीन ते चार दिवस नमुने तपासणी अहवालासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. वृद्धांना चाचणी आवश्यक आहे. परंतु चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा खूप जास्त करावी लागत असल्याने नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

महापौरांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे दिले निर्देश, संघटनेच्या मागणीनंतर साक्षात्कार 

एखाद्या वृद्धाचा चाचणी अहवाल चार दिवसांनी पॉझिटिव्ह आला अन् उपचार सुरू करण्यास लागलेल्या विलंबामुळे त्यांचा मृत्यू झाला तर जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित करण्यात येत आहे. फिरते चाचणी केंद्र सुरू करून महापालिकेने सुविधा दिली, परंतु चाचणीच्या अहवालाला लागणाऱ्या विलंबामुळे ही सुविधा बदनाम होत असल्याचेही चित्र आहे.

नगरसेवकांची कोंडी
नगरसेवक आपल्या भागात फिरत्या चाचणी केंद्राची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. चाचणी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसांपासून नागरिक नगरसेवकांना चाचणी अहवाल कधी येणार? अशी विचारणा करीत आहेत. अहवालाची निश्चित खात्री नसल्याने नगरसेवक नागरिकांपुढे तोंडघशी पडत आहेत. २४ तासांत नागरिकांच्या तपासणी अहवाल देण्यात यावा, अशी मागणी आता नगरसेवक करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid test center ineffective due to delay in covid test report!