
विदर्भाचा क्रिकेट सीझन नुकताच संपला. त्यामुळे सरवटे, वाडकर व गुरबानी परिवाराने त्यांच्या क्रिकेटर मुलांचे विवाह निश्चित करून या उन्हाळ्यात लग्नाचा बार उडवून टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाने तिन्ही परिवारांच्या आशेवर पाणी फेरले.
नागपूर : कोरोनाच्या संकटामुळे विविध क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. खेळाडूंच्या दैनंदिन सरावातही व्यत्यय आला आहे. कोरोनाच्या कचाट्यातून त्यांचे वैयक्तिक आयुष्यातही सुटू शकले नाही. 'लॉकडाउन'मुळे विदर्भाच्या तीन युवा क्रिकेटपटूंना आपले लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावे लागले. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तिघांचेही शुभमंगल पार पडणार आहे.
विदर्भाचा क्रिकेट सीझन नुकताच संपला. त्यामुळे सरवटे, वाडकर व गुरबानी परिवाराने त्यांच्या क्रिकेटर मुलांचे विवाह निश्चित करून या उन्हाळ्यात लग्नाचा बार उडवून टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाने तिन्ही परिवारांच्या आशेवर पाणी फेरले. 'लॉकडाउन'मुळे जमावबंदी असल्याने प्रशासनाने शहरातील सर्व विवाहसोहळे रद्द करण्याचे किंवा पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नाइलाजाने क्रिकेटपटूंच्या परिवारालाही आपापले लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नवीन मुहूर्त काढून विवाह उरकविणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भाचा लेगस्पिनर व अष्टपैलू क्रिकेटपटू आदित्य सरवटेचे लग्न सागर (मध्य प्रदेश) येथील अरुणिता मुरोतिया हिच्याशी ठरले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. येत्या 27 एप्रिलला लक्ष्मीनगर येथील अशोका हॉटेलमध्ये विवाह सोहळा होणार होता. "लॉकडाउन'मुळे सोहळा स्थगित करण्यात आल्याचे आदित्यने सांगितले. यष्टिरक्षक-फलंदाज अक्षय वाडकरचे लग्न श्रुतिकाशी दोन मे रोजी ठरले होते. दोन्ही परिवाराने विवाहाची जय्यत तयारी केली होती. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना अचानक कोरोना अवतरला आणि आनंदावर विरजण पडले.
तर युवा मध्यमगती गोलंदाज रजनिश गुरबानी हा शिवानीसोबत येत्या 18 मे रोजी विवाहबंधनात अडकणार होता. रजनीशच्याही आईवडिलांनी विवाहाची जंगी तयारी केली होती. त्यांनीहसुद्धा लग्नसमारंभ पुढे ढकलून नव्या मुहूर्तावर मुलाचा विवाह आयोजित करणार असल्याचे सांगितले. विदर्भ संघाला सलग दोनवेळा रणजी व इराणी करंडकाचे विजेतेपद मिळवून देण्यात या तिन्ही युवा क्रिकेटपटूंचा मोलाचा वाटा होता, हे विशेष.
अधिक वाचा : घरी जायची भीती, डोक्याचा भुगा, डोळ्यांत पाणी...ही त्यांची कहाणी
अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या विवाह सोहळ्याची सर्व तयारी झाली होती. परंतु, कोरोनामुळे हा सोहळा पुढे ढकलावा लागला. "लॉकडाउन' संपल्यानंतर आता मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने लग्न करण्याचे आम्ही निश्चित केले आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर एक तारीख निश्चित करून "रिसेप्शन' दिले जाईल.
-आदित्य सरवटे, विदर्भाचा अष्टपैलू क्रिकेटपटू