राजीनाम्यासाठी बळजबरी : मीटिंगच्या नावाने बोलावले अन् कर्मचाऱ्यांना कोंबून ठेवले; धक्कादायक प्रकार

राजेश प्रायकर
Tuesday, 13 October 2020

गेली पंधरा वर्षांपासून घराघरांतून कचरा उचलण्याचे काम करीत असलेल्‍या या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळातही जीव धोक्यात घालून नागरिकांच्या घरातील कचरा डम्पिंग यार्डपर्यंत पोहोचविला. आता एजी एन्व्हायरो कंपनीने पाचही झोनमधील शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

नागपूर : कोरोना काळात प्रतिबंधित क्षेत्रातील घरांपर्यंत पोहोचून कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचे प्रयत्न एजी एन्व्हायरोने सुरू केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एजी एन्व्हायरोने राजीनाम्यासाठी कर्मचाऱ्यांवर दडपण आणले जात आहे. मीटिंगच्या नावाने बोलावून राजीनामा देण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोंबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काहींनी नमूद केला.

मागील वर्षी नोव्हेंबरपासून घराघरातून कचरा उचलण्याचे कंत्राट एजी एन्व्हायरो व बीव्हीजी या कंपनीला देण्यात आले आहे. एजी एन्व्हायरो कंपनीकडे लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील घरांतून कचरा गोळा करण्याची जबाबदारी आहे. या पूर्वी शहरात कचरा गोळा करण्याचे कंत्राट कनक रिसोर्सेस कंपनीकडे होते. या कंपनीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर येथील अनेक कर्मचारी एजी एन्व्हायरोने नियुक्त केले. किंबहुना महापालिकेने याबाबत करार केला होता.

ठळक बातमी -  मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल

गेली पंधरा वर्षांपासून घराघरांतून कचरा उचलण्याचे काम करीत असलेल्‍या या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळातही जीव धोक्यात घालून नागरिकांच्या घरातील कचरा डम्पिंग यार्डपर्यंत पोहोचविला. आता एजी एन्व्हायरो कंपनीने पाचही झोनमधील शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

नुकताच तात्या टोपेनगरातील एका हॉलमध्ये या कर्मचाऱ्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले. येथे त्यांच्यावर दबाव टाकून राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे एका कर्मचाऱ्याने नमूद केले. अक्षरशः कर्मचाऱ्यांना कोंबून ठेवण्यात आल्याचेही काहींनी नमूद केले. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांची भेट झाली नाही.

ठळक बातमी - जीवनसाथी गमावलेल्यांच्या कोरोनामध्येही जुळल्या मनाच्या तारा

यापूर्वी एजीने केली होती वेतनात कपात

यापूर्वीही एजी एन्व्हायरोने कर्मचाऱ्यांना केवळ २० दिवसांचे काम व तेवढ्याचे दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ऐन लॉकडाउनच्या काळात कामबंदचे अस्त्र उगारले होते. त्यामुळे कचऱ्याची उचल थांबली होती. घराघरात कचरा गोळा झाला होता. अखेर तत्कालीन आयुक्तांनी कंपनीला समज दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील संकट टळले होते.

सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येईल
एजी एन्व्हायरोचे काही कर्मचारी भेटण्यास आले. परंतु, बाहेर असल्याने त्यांच्याशी भेट झाली. परंतु. त्यांचे निवेदन मिळाले. अचानक नोकरीवरून काढणे कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. कनक रिसोर्सेसमधील १५ वर्षांपासूनचे हे कर्मचारी एजीने नियुक्त केले. मनपासोबत त्यांना काम देण्याचा करार केला आहे. येत्या महासभेत याकडे प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येईल.
- तानाजी वनवे,
विरोधी पक्षनेते, महापालिका

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crisis on cleaning staff during Corona period