घर चालवावे की पिकावर खर्च करावा, शेतक-यांना पडला प्रश्‍न...

मनोहर घोळसे
मंगळवार, 2 जून 2020

खरिपाच्या तोंडावर कोरोना आला. कापूस व विक्री करण्याचे धान्य घरात पडलेले आहे. सरकारची कर्जमाफी मोजक्‍याच शेतक-यांना मिळाली. मुलांच्या शाळा सुरू होतील. अशा परिस्थितीत घरातील सदस्यांचे पूरे करायचे की पिकावर खर्च करायचा, असा विचार येत असल्याने शेतकरी हतबल आहेत.

सावनेर (जि.नागपूर  ) : शेतकरी वर्षभराचे नियोजन करून शेतात पिकाची लागवड करतो. खरीप हंगाम तोंडावर असल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपून लागवडीसाठी शेती सज्ज केली आहे.परंतु, अनेक लॉकडाउनच्या काळात आणखी संकटात भर पडल्यामुळे खरीप हंगाम गोत्यात आला आहे.

नक्‍की हे वाचा : काय हे, पालकांच्या मोबाईलवर मुलांचा ताबा, कुठे नेट नाही, तर कुठे रिचार्जची चिंता...

उपक्रम राबविला, पण खिशात दमडी नाही
तालुका कृषी विभागानेही ही खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. लॉकडाउनच्या काळात कृषी केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी शेतकरी गटामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर थेट बियाणे पोहोचविण्याचा उपक्रम राबविला जाणार असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे शेतमाल विक्री, पीककर्ज वाटपात होणारा विलंब, शेतमालाचे पडलेले भाव, अशा अनेक अडचणी आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतीला लागणारा खर्च करायचा कसा, या विवंचनेत दिसत आहेत.

हेही वाचा : पावसासह वादळ आले आणि घरासह होते नव्हते गेले !

अल्पभूधारकांचे काय?
पटकाखेडी या गावातील सधन शेतकरी बाबाराव भोंगाळे यांच्याकडे 60 एकर शेती आहे. या शेतीत त्यांनी कापूस, तूर, ज्वारी उत्पादन घेतले. उत्पादनही चांगले झाले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेती तोट्याची झाल्याचे ते सांगतात. तूर विक्रीसाठी होणारा विलंब बघून गरजेपोटी काही व्यापाऱ्यांना पडेल भावात विकावी लागली तर कापूस अद्यापही घरीच पडून असल्याने कापूस विक्री व खरीप हंगामाची चिंता आहे. तसेच शेतात राबणारे मजूर गावाला निघून गेल्याने मनुष्यबळाचा तुटवडा ही जाणवेल अशा परिस्थितीत शेतीच्या कामाला मजूर आणायचे कुठून, असा प्रश्नही त्यांना भेडसावत आहे. जर सधन शेतकरी आर्थिक अडचणीत असेल तर अल्पभूधारक शेतकऱ्यांचे काय हाल असणार? यामुळे शासकीय यंत्रणा किंवा खरेदी विक्री केंद्राने मुबलक व माफक दरात कर्ज स्वरूपात बी-बियाणे खते व औषधे उपलब्ध करून दिल्यास आम्हा शेतकऱ्यांची खरीप अडचण दूर होऊ शकते. असेही या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला बघून तालुक्‍यातील शेतकऱ्यांची अडचण दूर व्हावी यासाठी आम्हा शेतकऱ्यांना ताबडतोब बॅंकांनी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे उमरी येथील शेतकरी संजय
टेंभेकर सांगतात.

हेही वाचा : आर्थिक अडचणींमुळे रोख परत करणे शक्‍य नाही, मात्र,विश्‍वास ठेवा, सहलीला नक्‍की नेउ

कर्ज स्वरूपात आर्थिक मदत द्या !
यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावाने शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आम्हा शेतकऱ्यांवर आर्थिक अडचण असल्याने बियाणे, खते, कीटकनाशके माफक किंवा कर्ज स्वरूपात आर्थिक मदत देण्यात यावी.
श्‍याम धोटे
निळगाव येथील शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cultivation work done, now sowing worries