नागपूरकरांचा जिभेवर ताबा; तर्री पोहे-समोसा, सावजी मटण आहे, मात्र...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जून 2020

संक्रमणापूर्वीचा काळ आठवा, चौका-चौकात नाश्‍त्याची दुकाने होती. साऊथ इंडियन व चायनीजचे असंख्य ठेलेही होते. प्रत्येक ठिकाणी सतत ग्राहकांची वर्दळ असायची. भूक लागताच पावले आपोआप ठेल्यांकडे वळायची. भूक नसली तरी सायंकाळी घराबाहेर पडून जिभेचे चोचले पुरविणाऱ्यांचीही संख्या मोठीच. परंतु, कोरोनाने अगदी जीवनमानच पालटून टाकले आहे. संसर्गाच्या भीतीने अनेकांनी बाहेरच्या पदार्थांपासून फारकत घेतली आहे. घरी शक्‍य तेवढे जिभेचे लाड पुरवून समाधान मानले जाऊ लागले आहे. यामुळे नाश्‍ता विक्रेत्यांना रोजचा खर्च भागविणेही कठीण झाले आहे.

नागपूर : तर्री पोहे, तर्री समोसा, सावजी मटण यासारखे झणझणीत पदार्थांचे शौकीन अशी नागपूरकरांची एक अनोखी ओळख. अगदी दोसाही घेतला तरी सांबर झणझणीतच लागणार. चौकाचौकात लागणाऱ्या नाश्‍त्याच्या दुकानांवर कोरोना संक्रमणापूर्वी नागपूरकर खवय्यांची गर्दी व्हायची. अनलॉकनंतर उपराजधानी पुन्हा बहरू लागली. परंतु, कोरोनाच्या धास्तीने नागपूरकरांनी जिभेवर ताबा ठेवत नाश्‍त्याच्या दुकानापासून अंतर ठेवले आहेत. परिणामी नाश्‍ता विक्रेत्यांना रोजचा खर्च काढणेही कठीण आहे.

संक्रमणापूर्वीचा काळ आठवा, चौका-चौकात नाश्‍त्याची दुकाने होती. साऊथ इंडियन व चायनीजचे असंख्य ठेलेही होते. प्रत्येक ठिकाणी सतत ग्राहकांची वर्दळ असायची. भूक लागताच पावले आपोआप ठेल्यांकडे वळायची. भूक नसली तरी सायंकाळी घराबाहेर पडून जिभेचे चोचले पुरविणाऱ्यांचीही संख्या मोठीच. परंतु, कोरोनाने अगदी जीवनमानच पालटून टाकले आहे. संसर्गाच्या भीतीने अनेकांनी बाहेरच्या पदार्थांपासून फारकत घेतली आहे. घरी शक्‍य तेवढे जिभेचे लाड पुरवून समाधान मानले जाऊ लागले आहे. यामुळे नाश्‍ता विक्रेत्यांना रोजचा खर्च भागविणेही कठीण झाले आहे.

लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता येताच नाश्‍त्याची दुकाने असणाऱ्यांनी मोठ्या उमेदीने व्यवसाय पुन्हा सुरू केला. परंतु, त्यांना अपेक्षित प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाकाळात हातचे काम गेलेल्या अनेकांनी नाश्‍ता विक्रीकडे मोर्चा वळविला. अगदी सायकल, दुचाकी, ई-रिक्षावरून विविध पदार्थ घेऊन फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण, त्याच्याकडे अभावानेच ग्राहक येत आहेत. अनेकांनी दरही कमी करून बघितले. पण, ही क्‍लृप्तीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उपयोगी ठरली नाही. मालासाठी लाखणारा खर्च काढणेही कठीण असल्याचे विक्रेते सांगतात.

अवश्य वाचा- आर्थिक अडचणीतून सलून व्यावसायिकाने घेतला हा टोकाचा निर्णय...

येणाऱ्या दिवसांमध्ये खवय्ये परततील

सध्या केवळ पार्सलच देता येते. दुकानातच किंवा परिसरात नाश्‍ता करता येत नाही. यामुळे सध्याच ग्राहक नसले तरी येणाऱ्या दिवसांमध्ये खवय्ये नाश्‍त्याच्या दुकानांकडे परततील, असा विश्‍वास विक्रेत्यांना आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The customer did not come to the snack shop