लॉकडाउनमुळे चहाची चव झाली फिकी

गोकुल वैरागडे
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोनाचा उद्रेक झाला आणि लॉकडाउन लावण्यात आले. त्यामुळे चहाटपऱ्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे हवा हवासा वाटणारा, उत्साह, स्फूर्ती देणाऱ्या चहाची गेल्या दोन महिन्यापासून चव फिकी झाली आहे.

नांद ः भारतात चहा हा सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय. केवळ सकाळीच नव्हे तर दिवसभर चहा घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. तसा हा चहा भारतात सर्वत्र उपलब्ध असतो. हॉटेल्स, रेस्टारंटसोबत टपरीवर सुद्धा चहा सहजपणे मिळतो. मात्र, कोरोनाचा उद्रेक झाला आणि लॉकडाउन लावण्यात आले. त्यामुळे चहाटपऱ्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे हवा हवासा वाटणारा, उत्साह, स्फूर्ती देणाऱ्या चहाची गेल्या दोन महिन्यापासून चव फिकी झाली आहे.

लॉकडाउनमुळे टपरीवर चहा विकणाऱ्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले आहे. एक चहाविक्रेता दिवसाला 500 ते 600 रुपयांची विक्री करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. मात्र, लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद असल्याने उदरनिर्वाहाची चिंता असल्यामुळे चहाटपरीचालकांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. आता चहाची दुकानेच बंद असल्याने रोजची उलाढाल होत असलेला हा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होते आहे. चहाविक्रेत्यांना तर लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला. ते आता मोलमजुरी, भाजीपाल्याचे दुकान थाटून तसेच इतर उद्योगांकडे रोजगारासाठी पर्याय शोधत आहेत. शहरासह ग्रामीण भागात चहा पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

वाचा - याचे वजन म्हणे दीड किलो? अरे हा तर खरेच फळांचा राजा!

प्रत्येक शासकीय कार्यालय, हॉस्पिटल तसेच चौकाचौकांत चहाची छोटी-मोठी दुकाने असून त्यांच्याकडे ग्राहकांची मोठी गर्दी असायची. मात्र, 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू झाल्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे चहाटपऱ्या पूर्णतः बंद आहेत. चहाविक्रेत्यांची दुकाने तसेच छोट्या कॅंटिन बंद असल्याने उलाढाल ठप्प झाली आहे. चहाविक्री करून संसार चालविणाऱ्यांसमोर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यापैकी काहींनी आता अन्य रोजगार सुरू केले आहेत. या काळात संसाराची गाडी हाकण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मात्र, ही वेळही निघून जाईल आणि पूर्वीसारखे व्यवसाय आणि उद्योग सुरू होतील. मात्र, त्यासाठी प्रत्येकाने घरात राहून प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे.

आणखी वाचा - प्रस्ताव मंजुरीसाठी त्यांनी मागितली चिरीमिरी,अलगद अडकले पोलिसांच्या जाळ्यात!

उधारी परत करण्यास अडचणी
चहाविक्रेते रोज बॅंकेत 100 ते 200 रुपयांप्रमाणे एजंटकडे पैसे गोळा करतात. मात्र, गत दीड महिन्यापासून चहाविक्रीची दुकानेच बंद असल्याने भविष्यातील छोट्या-मोठ्या संकटकाळासाठी जमा केलेली ही रक्कम आता बंद झाली आली आहे. पर्यायाने हीच रक्कम बॅंकेतून परत घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily tea stall business affected by Lockdown