बॉलिवूडमध्ये संधी देण्याचे आमिष दाखवून डान्स ट्रेनरने केला विद्यार्थीनीवर बलात्कार

अनिल कांबळे 
Wednesday, 7 October 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतनू झोडापे हा नृत्य प्रशिक्षक असून त्याने एकता नगरात डान्स ॲकेडमी उघडली. मुंबईतून बॉलीवूडमध्ये प्रशिक्षक असल्याची त्याने बोंब उडवली.

नागपूर ः डान्स ॲकेडमीत ट्रेनिंग घेण्यासाठी येत असलेल्या विद्यार्थीनीवर नृत्य प्रशिक्षकाने एक्स्ट्रा क्लासच्या नावावर थांबवून बलात्कार केला. या प्रकरणी विद्यार्थीनीच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शांतनू नवीन झोडापे (२३, एकता कॉलनी, यशोधरानगर) असे आरोपी डान्स ट्रेनरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतनू झोडापे हा नृत्य प्रशिक्षक असून त्याने एकता नगरात डान्स ॲकेडमी उघडली. मुंबईतून बॉलीवूडमध्ये प्रशिक्षक असल्याची त्याने बोंब उडवली. तसेच अनेक शोमध्ये सेटींगने डान्सरला पाठविल्याचे तो सांगत होता. त्यामुळे नृत्याची आवड असणाऱ्या आणि बॉलीवूडमध्ये नशिब आजमाविण्याची संधीच्या शोधात असलेल्या तरूणी शांतनूच्या डान्स ॲकेडमीत ॲडमिशन घेत होत्या. 

ठळक बातमी - मुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर! विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु

गेल्या वर्षभरापासून पीडित २२ वर्षीय तरूणी रिया (बदललेले नाव) शांतनूच्या ॲकेडमीत शिकत होती. काही दिवस प्रशिक्षण दिल्यानंतर तो रियाला एक्स्ट्रा क्लाससाठी थांबवित होता. डान्स शिकवित असताना तिला नको त्या ठिकाणी हात लावत होता. तिने नकार दिल्यास तिला सर्वांसमोर अपमानित करीत होता. 

४ मार्च ला त्याने तिला ॲकेडमीत रात्री थांबवले. तिला प्रपोज करीत शारीरिक संबंधाची मागणी केली. नकार दिल्यास आपले अफेअर असल्याची बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर रियावर त्याने बळजबरी बलात्कार केला. त्यानंतर तो तिला वारंवार एक्स्‍ट्रा क्लास द्यायला लागला. शांतनूच्या अत्याचाराला कंटाळून रियाने क्लास बंद केला. त्यामुळे तो थेट घरासमोर येऊन तिला फोन करणे, मॅसेज करणे असे प्रकार तो करीत होता. तसेच आईवडीलाला सांगण्याची धमकी देत होता.

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

पोलिसात केली तक्रार

१३ सप्टेबरला रियाने पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल करण्यापूर्वी शांतनूला बोलविण्यास सांगितले. शांतनू आला आणि त्याने रियाची समजूत घालून लग्न करण्याचे आमिष दिले. तिला तो घरी घेऊन गेला आणि तिच्यावर पुन्हा त्याने बलात्कार केला. तसेच लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी थेट बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dance trainer misbehave with girl in nagpur