रामायणातील ‘हनुमान'ने नागपुरात दिली होती किंग काँगला धोबीपछाड, वाचा रुस्तम-ए-हिंदबद्दल...

Dara Singh had defeated King Kong in Nagpur
Dara Singh had defeated King Kong in Nagpur

नागपूर : विश्वविख्यात कुस्तीपटू रुस्तम-ए-हिंद स्व. दारासिंग यांनी जगभरातील पहेलवानांना धोबीपछाड दिली आहे. नागपूरकरांनाही दोनवेळा त्यांची कुस्ती जवळून पाहण्याची संधी मिळाली होती. महाल येथील चिटणीस पार्कवर झालेल्या ऐतिहासिक स्पर्धेत दारासिंग यांनी धिप्पाड किंग काँगसह अनेक पहेलवानांना पटकनी देऊन नागपूरकरांची मने जिंकली होती. चला तर वाचूया त्या सामन्याविषयी...

दारासिंग हे साठच्या दशकात व्यावसायिक फ्रीस्टाइल कुस्ती खेळण्यासाठी नागपूरला आले होते. त्यावेळी नागपुरात कुस्तीच्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा व दंगली व्हायच्या. अशाच एका स्पर्धेच्या वेळी उंचपुऱ्या व बलदंड शरीराच्या दारासिंग यांनी दोनशे किलो वजनाच्या अत्यंत धिप्पाड किंग काँगला धूळ चारून उपस्थितांची वाहवा मिळविली होती. याशिवाय दारासिंग यांनी पाकिस्तानचा पहेलवान माजिद अक्रम व इंग्लंडच्या रॉबिन्सनलाही धूळ चारली.

दारासिंग यांची कुस्ती ‘याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी चिटणीस पार्कवर प्रेक्षकांची अलोट गर्दी जमली होती. अगदी लहान मुलांपासून, तरुण मंडळी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. त्या दिवशी तिकीट असूनही अख्खे चिटणीस पार्क खच्चून भरले होते. स्टेडियमच्या बाहेर आणि रोडवरही प्रचंड गर्दी होती. केवळ शहरातूनच नव्हे, ग्रामीण भागांतूनही कुस्तीप्रेमी लढत पाहायला आले होते.

कुस्तीचा प्रचार करण्यासाठी रिक्षावर भोंगे लावून तो रिक्षा शहरातील विविध रस्त्यांवरून फिरवण्यात आला होता. त्या लढतीची अनेक दिवसपर्यंत पंचक्रोशीत चर्चा होती. उल्लेखनीय म्हणजे, दारासिंग यांच्यापासून प्रेरणा घेत अनेक युवकांनी त्यानंतर कुस्तीत करिअर करण्याचा निर्णय घेतल्याचे जुने जाणकार सांगतात.

स्पर्धेच्या निमित्ताने दारासिंग यांचा दोन दिवस नागपुरातील आमदार निवासात मुक्काम होता. त्यावेळी नागपूरकरांनीही केलेले आदरातिथ्य पाहून दारासिंग अक्षरशः भारावून गेले होते. विजेत्या दारासिंग यांनी पुन्हा येण्याचे आश्वासन देत नागपूर सोडले होते. १९८७ मध्ये पुन्हा यशवंत स्टेडियममध्ये झालेल्या स्पर्धेच्या निमित्ताने नागपूरला भेट देऊन त्यांनी आपले आश्वासन पाळले होते. दारासिंग यांचा भाऊ रंधावाही नागपुरात कुस्ती खेळल्याची माहिती आहे.

कुस्तीपटू, अभिनेता, राजकीय नेते, निर्माता, दिग्दर्शक व लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व राहिलेले दारासिंग (दिदारसिंग रंधावा) यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२८ मध्ये अमृतसर जिल्ह्यातील धरमूचक येथे झाला. जाट शीख परिवारात जन्मलेले दारासिंग मजबूत बांध्याचे होते. त्यामुळे त्यांनी पहेलवानकी करण्याचा निर्णय घेतला. ताकदीच्या जोरावर दारासिंग यांनी अनेक पहेलवानांना पराभूत केले. त्यानंतर ते राष्ट्रकुल चॅम्पियन व पुढे वर्ल्ड चॅम्पियनही झाले. उल्लेखनीय म्हणजे दारासिंग हे जवळपास पाचशे कुस्त्या लढलेत. त्यातील एकही लढत त्यांनी गमावली नाही. कुस्तीतील सर्वात मोठा व प्रतिष्ठेचा बहुमान समजला जाणारा रुस्तम-ए-हिंद (१९७८ मध्ये) या किताबाने त्यांना गौरविण्यात आले. दारासिंग यांनी दोनशे किलो वजनाच्या अत्यंत धिप्पाड किंग काँगसह जगभरातील पहेलवानांना धुळ चारली. त्यानंतर ते राष्ट्रकुल चॅम्पियन व पुढे वर्ल्ड चॅम्पियनही झाले.

‘रामायण' मालिकेत साकारली होती हनुमानाची भूमिका

दारासिंग यांनी जवळपास दीडशे पंजाबी व हिंदी चित्रपटांत काम केले. रामानंद सागर यांची दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘रामायण' ही मालिका त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील ‘मास्टरस्ट्रोक' ठरला. या मालिकेत साकारलेल्या हनुमानाच्या भूमिकेने ते घराघरांत पोहोचले. टीव्ही सिरियल्समध्येही त्यांनी काम केले.

राजकारणातही होते अग्रेसर

दारासिंग राजकारणातही अग्रेसर राहिले. २००३ ते २००९ या काळात ते भाजपचे राज्यसभेवर सदस्य होते. दारासिंग यांनी जवळपास चार दशके (१९४७ ते १९८३ पर्यंत) कुस्तीची मैदाने गाजविली. अभिनय क्षेत्रात त्यांची सहा दशकांची (१९५० ते २०१२) यशस्वी कारकीर्द राहिली. तीन मुले व तीन मुलींचे पिता राहिलेले दारासिंग वयाच्या ८३ व्या वर्षी (१२ जुलै २०१२ रोजी) लाखो चाहत्यांना सोडून गेले.

अनेकांनी बघितला कुस्तीचा सुवर्णकाळ

नागपूरच्या कुस्तीचा सुवर्णकाळ जवळून पाहणारे विदर्भ कुस्ती संघटनेचे सचिव सीताराम भोतमांगे आणि माजी कुस्तीपटू हरिहर भवाळकर नागपुरातील आखाड्यांच्या दुरवस्थेबद्देल ‘सकाळ'शी बोलताना म्हणाले, ६० ते ८० च्या दशकांत नागपुरात घराघरांत पहेलवान दिसायचे. कुस्त्या पाहण्यासाठी महिला व आबालवृद्धांसह मैदानावर हजारोंची गर्दी असायची. दारासिंग व रंधावाशिवाय काला पहाड आणि पाकिस्तानच्या आझम व अक्रमसारख्या विश्‍वविख्यात पहेलवानांचाही खेळ नागपूरकरांनी जवळून पाहिला. धंतोली, महाल, इतवारी, तांडापेठ, सिरसपेठ, तेलनखेडीसारख्या भागांमध्ये पोळ्याचा पाडवा, नागपंचमी, तीळसंक्रातीच्या पावन पर्वावर मोठ्या प्रमाणावर कुस्त्या व्हायच्या. अगदी चित्रपटात दाखविले जाणारे चित्र एकेकाळी नागपूर शहरात दिसायचे. परंतु, आता ते सर्व इतिहासजमा झाले आहे. आता ना कुस्त्यांचे फड दिसतात, ना पिळदार दंडाचे पहेलवान शिल्लक राहिलेत. नागपूरच नव्हे विदर्भातील कुस्तीलाच आता घरघर लागली आहे. अनेक व्यायामशाळा बंद पडल्या आणि ज्या शिल्लक आहेत, त्या भकास व खंडहर अवस्थेत आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये कुस्तीबद्दल फारसे आकर्षण शिल्लक राहिले नाही.

राजाश्रयाअभावी कुस्तीला अवकळा

कुस्तीच्या अधोगतीसाठी असंख्य गोष्टी जबाबदार आहेत. उल्लेखनीय म्हणजे कुस्तीला आता पूर्वीसारखा राजाश्रय राहिला नाही. बहुसंख्य व्यायामशाळा आर्थिक अडचणींमध्ये आहेत. सरकारकडून त्यांना अनुदान मिळत नाही. शिवाय पदाधिकाऱ्यांची आपापसातील भांडणतंटेही कुस्तीला उतरती कळा लागण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. पदाधिकाऱ्यांच्या भांडणांमुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे. कुस्तीपटूंना प्रोत्साहन नाही, पाठबळही नाही. नियमितपणे स्पर्धा व शिबिरे होत नसल्यामुळे युवा पिढींच्या मनात कुस्तीबद्दलचे आकर्षणच संपलेले आहे. पैसा कमावण्याच्या उद्देशाने जागोजागी थाटण्यात आलेले फिटनेस क्‍लब आणि आधुनिकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या जिम संस्कृतीत कुस्तीच आता चीत झाली आहे.

राष्ट्रसंतांनी केले होते युवकांना एकत्र

स्वातंत्र्यपूर्व काळात कर्नलबाग आणि नवाबपुरा यांच्यात मोठ्या प्रमाणावर भांडणे व्हायची. या भांडणात अनेकांना प्राणही गमवावे लागले. नवाबपुऱ्यात बसणाऱ्या मस्कऱ्या गणपतीच्या निमित्ताने ही भांडणे आणखीणच शिगेला जात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे बघितलं. आखाड्यात व्यायाम करणाऱ्या युवकांना त्यांनी एकत्र बसवलं आणि समजावलं. आपली शक्‍ती विघातक कृत्यात खर्च करण्यापेक्षा इंग्रजांविरुद्ध लढण्यात घालवा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. राष्ट्रसंतांचे विचार या मंडळींना पटले. त्यानंतर कालांतराने भांडणेदेखील थांबली. आखाड्यांच्या माध्यमातून सर्व जणांना एकत्र करीत तुकडोजी महाराजांनी नागपूर नगर आखाडा संघटन समितीची स्थापना केली. समितीची घटना खुद्द राष्ट्रसंतांनीच तयार केली होती.

कुस्तीची आकडेवारी

  • ६० आणि ७०च्या दशकांत नागपुरात शंभरच्यावर आखाडे व व्यायामशाळा होत्या. त्यात घट होऊन ही संख्या ३० ते ४० वर आली आहे. त्यापैकी केवळ १० ते १२ आखाडेच सद्यःस्थितीत सक्रिय आहेत.

  • विविध आखाड्यांचे मिळून हजारांवर पहेलवान होते. आज पहेलवानांची संख्या पाच पन्नासावर आली आहे.

  • कुस्तीची प्रमुख स्थळे : चिटणीस पार्क (महाल), यशवंत स्टेडियम (धंतोली), नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय (इंडियन जिमखाना मैदान), हत्तीखाना, बजेरिया, तेलीपुरा, कॉटन मार्केट, जूना बगडगंज, तेलनखेडी तलाव, पारडी, सी. ए. रोड इत्यादी.

  • कुस्तीचे मैदान गाजविणारे नागपूरचे प्रसिद्ध पहेलवान : विदर्भकेसरी विजेते खासदार रामदास तडस, हरिहर भवाळकर, गणपत वाघाडे, विठ्ठलराव जाधव, मधुकर भुरकुडे, गंगाधर चिकाने, शंकर देवगडे, बंसी देवगडे, बाळकृष्ण देवगडे, धोंडबा कुकडे, गेंदलाल बाटी, विजय मिश्रा इत्यादी.

 संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com