थरारक घटनाक्रम : मध्यरात्री घरात शिरले दरोडेखोर; बापलेकावर हल्ला केल्यानंतर शस्‍त्र टाकून काढला पळ

Deadly attack on Bapleka in Nagpur
Deadly attack on Bapleka in Nagpur

नागपूर : दरोडेखोरांनी शस्‍त्रांसह घरात प्रवेश केला. मात्र, वडिलांना जाग येताच दरोडेखोरांनी प्रथम त्यांच्यावर हल्ला चढविला. ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगाही पोहोचला. दरोडेखोरांनी सपासप वार करीत त्यालाही जखमी केले. अशा स्थितीत दोघांनी प्रतिकार करीत आरडाओरड केली. अखेर दरोडेखोरांनीच शस्‍त्र टाकून पळ काढला. हा थरारक घटनाक्रम शुक्रवारी पहाटे बेलतरोडी हद्दीतील साकेतनगरात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमण काशिनाथ गिरडकर (६०, रा. साकेतनगर) असे जखमी वडिलांचे नाव आहे. या घटनेत त्यांचा मोठा मुलगा विपुल गंभीर जखमी झाला आहे. रमण हे दूरसंचार कंपनीच्या कारखाना विभागातून मुख्य क्षेत्रीय अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. ते पत्नी, दोन मुले, सून व नातीणसह राहतात.

तळमजल्यावर जीम असून, कुटुंबीय वरच्या मजल्यावर राहते. एरवी कंपाउंडच्या गेटसह तळमजल्यावरील गेटलाही कुलूप लावले जाते. पण, गुरुवारी रात्री अचानक पाऊस आल्याने कुलूप लावण्याकडे दुर्लक्ष झाले. ही दरोडेखोरांसाठी आयती संधी ठरली. मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास चार ते पाच सशस्‍त्र दरोडेखोर घरात शिरले. हालचालीमुळे रमण यांना जाग आली. उठताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर अचानक धारदार शस्‍त्राने वार केला.

रमण यांनी दरोडेखोराकडील चाकू हातात पकडून ठेवला व आरडाओरड केली. आवाज ऐकून त्यांचा मोठा मुलगा विपुल धावत आला. झटापटीत दरोडेखोरांनी विपुलचे डोके, छाती, कंबरेवर वार करून गंभीर जखमी केले. बापलेकासह कुटुंबीय मदतीसाठी आरडाओरड करीत असल्याने दरोडेखोर घाबरून पळून गेले. सोबत आणलेले शस्‍त्रही त्यांनी घरासमोरच फेकून दिले.

पोलिसांची तत्परता

थरारक घटनाक्रमानंतरही गिरडकर कुटुंबीयांनी घाबरून न जाता तत्काळ पोलिसांना फोनवरून माहिती दिली. पहाटे ३.२० पर्यंत पोलिस अधिकारी ताफ्यासह दाखल झाले. पोलिसांनी तत्परता दाखवीत दरोडेखोरांचा शोधही सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरून सब्बल व कटोनी तर घराबाहेर पडलेले धारदार शस्‍त्र जप्त केले. पोलिसांची विविध पथके तयार करून त्यांना दरोडेखोरांच्या मागावर सोडण्यात आली आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com