अभिमानास्पद! राजधानीपासून तर उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातापदावर विदर्भाचा झेंडा

केवल जीवनतारे
Saturday, 10 October 2020

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे हे नागपूरच्या मेडिकलमधील विद्यार्थी असून ते नागपूरचे आहेत. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावर आरूढ असलेल्या डॉ. मीनाक्षी वहाणे या मूळच्या नागपुरातील आहेत.

नागपूर : राजधानी मुंबईतील जे जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून तर उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) आणि राज्यातील १८ पैकी सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाच्या खुर्चीवर विदर्भातील डॉक्टर कार्यरत आहेत.

राज्यभरात १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये आहेत. यात विदर्भातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि अकोला या सहा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावर विदर्भातील व्यक्ती कार्यरत आहेत. तर मुंबईच्या जे जे हॉस्पिटलच्या अधिष्ठाता पदावर नागपूरचे डॉ. रणजित मानकेश्वर आरूढ झाले आहेत.

क्लिक करा - हाकलल्यानंतरही सतत रुग्णालयात यायचा श्वान; सत्य आले समोर

उपराजधानीच शहर असलेल्या नागपुरातील मेडिकलमध्ये डॉ. सजल मित्रा अधिष्ठाता पदाच्या खुर्चीवर काम करीत आहेत. प्राचीन अशा सर्वोपचार रुग्णालयाचे पुढे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर झाले. अशा मेयो अर्थात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावर डॉ. अजय केवलिया कार्यरत आहेत. ते मूळचे वर्धेचे आहे. याशिवाय यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावर डॉ. मिलिंद कांबळे आहेत. त्यांचे वैद्यकीय शिक्षण मेयो रुग्णालयात झाले आहे. ते मूळचे यवतमाळ येथील आहेत.

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे हे नागपूरच्या मेडिकलमधील विद्यार्थी असून ते नागपूरचे आहेत. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावर आरूढ असलेल्या डॉ. मीनाक्षी वहाणे या मूळच्या नागपुरातील आहेत.

सविस्तर वाचा - तो ड्युटीसाठी दररोज चालतो २२ किमी पायी!

याशिवाय गोंदियाच्या अधिष्ठाताच्या खुर्चीत बसलेले डॉ. नरेश तिरपूडे हे देखील नागपूरचे आहेत. यापूर्वी नागपूरचे डॉ. अपूर्व पावडे यांच्याकडे गोंदिया तसेच काही महिने अकोला येथील अधिष्ठाता पदाचा कार्यभार होता. अशाप्रकारे राज्याच्या राजधानीपासून तर उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता पदावर विदर्भाचा झेंडा आहे.

दोघांची नियुक्ती लवकरच

सुपर स्पेशालिटीतील गॅस्‍ट्र्रोएन्ट्रोलॉजी विभागप्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांना अधिष्ठाता पदावर पदोन्नती मिळाली आहे. परंतु, अद्याप त्यांनी पदभार स्वीकारला नाही. त्यांनी रुजू होण्याचा कालावधी वाढवून घेतला आहे. याशिवाय मेडिकलच्या त्वचारोग विभागप्रमुख डॉ. आर. पी. सिंग यांनी काही महिन्यांपूर्वी यवतमाळ येथे अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते देखील पदोन्नतीने अधिष्ठाता पदावर लवकरच रुजू होतील, असे संकेत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dean of Vidarbha on seven medical colleges