esakal | "ते' दोघे पती-पत्नी दुचाकीवर जात होते घराकडे, रस्त्यातच कशा तुटल्या जन्माच्या गाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

कामठी :अपघात झालेला खेडी-परसोडी मार्ग.

"ते' दोघे पती-पत्नी काही कामानिमित्त बाहेरगावी गेले. काम आटोपून चिलापिलांच्या ओढीने ते दोघेही लगबग करीत घराकडे निघाले. दुचाकीवर रात्रीच्या सुमारास गावाकडे परतत असताना रस्त्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे रस्त्यावर पसरलेली गिट्‌टी पतींना दिसली नाही. त्यात दुचाकी स्लिप झाली, अन्‌ काय झाले हे कळायच्या आधीच त्यांच्या जन्माच्या गाठी तुटल्या..

"ते' दोघे पती-पत्नी दुचाकीवर जात होते घराकडे, रस्त्यातच कशा तुटल्या जन्माच्या गाठी...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कामठी (जि.नागपूर) : लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे सकाळी लगबगीने दोघेही पती-पत्नी गावी गेले. महत्वाचे कामकाज आटोपून रात्री दहा वाजता बोलत घराकडे परत येत असताना पतीला रस्त्यावर पडलेली गिट्‌टी न दिसल्यामुळे दुचाकी "स्लिप' झाली. दुचाकीसह दोघेही खाली पडले. पत्नीला खडबडीत रस्त्याचा जोरदार मार बसून तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात पती किरकोळ जखमी झाले.

नक्‍की हे वाचा : काय हे, पालकांच्या मोबाईलवर मुलांचा ताबा, कुठे नेट नाही, तर कुठे रिचार्जची चिंता...

रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे गिट्‌टी पडली रस्त्याव
साधारणतः रस्ता दुरुस्तीची कामे एप्रिलपासून सुरू होतात. परंतु, लॉकडाउन असल्याने ही कामे होऊ शकली नाहीत. ग्रामीण भागात संबंधित विभागाचे अधिकारी क्वचितच ये-जा करीत असल्याने हे कंत्राटदार मर्जीनुसार काम करीत असतात. सध्या बिडगाव सिवनी मेनरोडचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाकरिता कंत्राटदाराने ठिकठिकाणी गिट्टी चुरी रस्त्यांवर आणून टाकलेली आहे. या रस्त्यांवरून रात्रीच्यावेळी तरोडी, टेमसना, आडका, बिडगाव, सिवनी आदींसह आसपासच्या गावाचे नागरिक ये-जा करतात. रविवारी पडसाड येथील रहिवासी प्रियांका रवी शेंडे ही महिला पतीसह बहादुरा येथे कामानिमित्त गेले होते. रात्री दहा वाजताच्या सुमारास घराकडे परत येत असताना रस्त्यात टाकण्यात आलेल्या गिट्‌टीवर दुचाकी स्लिप होऊन प्रियांकाचा मृत्यू झाला तर तिचे पती रवी किरकोळ जखमी झाले. याच ठिकाणी पुन्हा एक घटना काही वेळेअगोदर घडली. त्यात सोनेगाव राजा येथील पांडुरंग गणपतराव ढोले हे दुचाकीने या मार्गावरून जात असताना त्यांचीही दुचाकी स्लिप होऊन तेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : पावसासह वादळ आले आणि घरासह होते नव्हते गेले !

अपघात घडताच गिट्‌टी हटविली
या घटनेची माहिती गावांत पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रियांकाला उपचाराकरिता नागपूर मार्गावरील खासगी रुग्णालयात आणले असता डॉक्‍टरांनी तपासणी करून मृत झाल्याचे घोषित केले. मृत्यू झाल्याचे कळताच गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. कुणीतरी संबंधित कंत्राटदाराला सूचना दिल्याने रातोरात रस्त्याच्या मध्ये टाकण्यात आलेली गिट्टी जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वडोदा भूगाव सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे यांनी केली आहे.