पावसासह वादळ आले आणि घरासह होते नव्हते गेले!

पुरुषोत्तम डोरले
सोमवार, 1 जून 2020

रविवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला. अचानक आलेल्या या वादळात तारसा येथील घरावरचे व बैलाच्या गोठ्यावरचे टीनाचे शेड उडाले. बानोर येथील घरांचे छतही उडाले. त्यामुळे घरातील सामानाचे अतोनात नुकसान झाले.

मौदा (जि. नागपूर) : आधीच कोरोना महामारीने जीणे कठीण केले असतानाच, कधी आग तर कधी वादळी पाऊस अशा अस्मानी संकटांनी शेतकऱ्यांच्या संकटात भरच पडते आहे. तालुक्‍यात रविवारी सायंकाळी 5 वाजता आलेल्या वादळाच्या तडाख्याने तालुक्‍यातील बानोर या गावी अतोनात नुकसान झाले. वादळी पावसासह वीज पडून धानला येथील 70 एकरातले तणीस जळून खाक झाले.
रविवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला. अचानक आलेल्या या वादळात तारसा येथील घरावरचे व बैलाच्या गोठ्यावरचे टीनाचे शेड उडाले. बानोर येथील घरांचे छतही उडाले. त्यामुळे घरातील सामानाचे अतोनात नुकसान झाले. या घरातील नागरिकांना प्राथमिक शाळा बानोर व अंगणवाडी येथे हलविण्यात आले आहे. गावात जाऊन शासनातर्फे तलाठी संजय पडवाल, ग्रामसेवक शरद देशमुख, सरपंच यांनी नुकसान झालेल्या घरांचा पंचनामा केला व अहवाल तहसिलदार प्रशांत सांगडे यांच्याकडे सादर केला.
तणीससह घरही जळाले
तालुक्‍यात रविवारी सायंकाळी आलेल्या वादळाने काही भागात झाडेही पडली. धानला गावात आष्टी रोडवरील धनराज नामदेव यांच्या शेतात वीज पडुन 70 एकरातील तणिस व शेतातील घरही जळाले.

सविस्तर वाचा - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चौघांनी पाजली दारू, पुढे काय झालं वाचा...
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन समितीचे सभापती तापेश्वर वैद्य यांनी घटनास्थळी धाव घेऊन मौदा उपविभागीय अधिकारी,तहसिलदार मौदा यांना माहिती देऊन अग्निशमनची गाडी बोलावली. दोन अग्निशमनच्या गाड्यांनी आग विझवली. परंतु तोपर्यंत संपूर्ण तणीस जळून खाक झाले होते. धानला येथील पटवारी सुंदरे यांनी पंचनामा करून मौदा तहसिलदार यांच्याकडे अहवाल पाठविला.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stromy rain in Mouda