कोणी सांगेल का? माझी काय चूक होती...

नीलेश डाखोरे
Monday, 10 February 2020

नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना माझ्यावर एकतर्फी प्रेम करणारा विकेश नगराळे (27) याने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. मी मदतीसाठी ओरड होती. मात्र, काहीही उपयोग झाला नाही.

नागपूर : मी अंकिता पिसुड्डे... ओळखलं ना?... नक्‍की ओळखलं असणारच... कारण, मागील सात दिवसांपासून माझीच चर्चा सुरू आहे ना... माझ्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या माथेफीरू युवकाने पेट्रोल टाकून जाळले. कारण, त्या युवकाला मी होकार दिला नाही. मला सांगा यात माझी चूक काय होती? सात दिवस मी जगण्यासाठी झुंज दिली; मात्र मृत्यूच पदरी पडला. विना कारणच माझा जीव गेला ना... 

मी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्‍यात येणाऱ्या दारोडा गावात राहते. घरी आई-वडील, भाऊ आणि मी असे छोटेचे कुटुंब... वडील शेतकरी... आई गृहिणी असून, वेळप्रसंगी शेतात जाऊन वडिलांना मदत करते. भाऊ लहाण असून, शिक्षण घेत आहे. आमच्या घरची परिस्थती फार चांगली नाही. अशाही परिस्थितीत वडिलांनी आम्हा दोघा बहीण-भावाला शिक्षण दिले. मी बॉटनीमध्ये एमएससीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. मला शिकवण्यासाठी आई-वडिलांनी फार कष्ट उपसले. त्यांचा संघर्ष मी बघितला. त्यांना मदत व्हावी म्हणून मी नोकरी करण्याचे ठरवले होते. 

हेही वाचा - हिंगणघाटमधील पीडिता प्राध्यापिका हरली जीवनाची परीक्षा

जवळपास दोन वर्षांपूर्वी बऱ्याच प्रयत्नानंतर मला मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये तासिका प्राध्यापिकांची नोकरी लागली. येथे मी विद्यार्थिनींना बॉटनी हा विषय शिकवत होती. घरची परिस्थिती चांगली नसल्याने कॉलेजमध्ये जाण्यासाठी गाडीही नाही. त्यामुळे रोज बसने कॉजेजमध्ये जात होती. वडिलांना मदत करण्यासाठी त्रास सहन करीत होती. मात्र, सोमवार (ता. तीन) माझ्यासाठी "काळा'वार ठरला. 

नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना माझ्यावर एकतर्फी प्रेम करणारा विकेश नगराळे (27) याने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. मी मदतीसाठी ओरड होती. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. काही वेळांनी तिथून जात असलेल्या सहकारी प्राध्यापिका आणि इतर युवकांनी आग विझवून मला रुग्णालयात दाखल केले. 

गंभीर भाजल्याने मला नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. सात दिवसांपासून माझ्यावर उपचार सुरू होता. मात्र, मागील दोन दिवसांपूर्वी प्रकृती अधिकच खालावली. यामुळे मला कृत्रिम श्‍वासोच्छासाचीही गरज भासली. मात्र, पुन्हा सोमवार माझ्यासाठी "काळा'वार ठरला. सोमवारीच मला पेट्रोल टाकून जाळले आणि सोमवारीच माझा मृत्यू झाला. माझा जीव तर परत येणार नाही. परंतु, आता पुन्हा कोणत्याही मुलीशी असे व्हायला नको, अशी इश्‍वराकडे नक्‍कीच प्रार्थना करणार आहे... 

माझा जीव परत येईल का?

हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याची वार्ता समजताच अनेकांचा रोष अनावर झाला. संतप्त नागरिकांनी आरोपी विकेश नगराळेला त्याच घटनास्थळी पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची मागणी केली. मात्र, याचा उपयोग काय होणार तुम्हीच सांगा... माझा जीव परत येईल का?... 

काय झाले असावे - गृहमंत्र्यांचा फोन अन्‌ कुटुंबीयांनी दर्शवली मृतदेह स्वीकारण्याची तयारी

मुलींनो, खबरदारी घ्या

सध्या फेब्रुवारी महिना सुरू असून, "व्हॅलेंटाईन डे'चा आठवडा सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांमध्ये प्रेमाचे भूत शिरले आहेत. मला युवकाने भरचौकात पेट्रोल टाकून जाळले. आता पुन्हा अशी घटना होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुलींनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. माझ्यासोबत जे झाले ते झाले; परंतु तुमच्या सोबत काही वाईट होणार नाही, याची काळजी तुम्हीच घ्या... 

'त्या' रांगेत माझाही नंबर

जवळपास सात वर्षांपूर्वी दिल्लीत असाच प्रकार घटला होता. चार आरोपींनी निर्भयाशी अत्याचार केला होता. काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला. अद्याप तिच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालेली नाही. काही महिन्यांपूर्वी हैदराबादमध्ये डॉक्‍टर तरुणीवर बलात्कार करून जाळले होते. तिच्या मारेकऱ्यांना हैदराबाद पोलिसांनी जागीच ठार केले होते. अमरावतीत एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून करण्यात आला. आता मलाही त्या रांगेत उभे केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death of victim in hinganghat