बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक, २४ तासांत ३० मृत्यू

Decrease in percentage of active corona patients in Nagpur
Decrease in percentage of active corona patients in Nagpur

नागपूर : सप्टेंबरमध्ये रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या १५ हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र, ऑक्टोबरच्या पहिल्या १२ दिवसांमध्ये प्रथमच शहरी व ग्रामीण भागातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या साडेसात हजारांवर आली आहे. १२ दिवसांमध्ये उपचार घेत असलेले ४० टक्के रुग्ण बरे झाले. मृत्यूचा टक्काही खाली आला होता. परंतु, २४ तासांमध्ये सोमवारी ३० बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ६५८ बाधितांची भर पडली आहे. सोमवारी नवीन बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या जास्त आहे.

नागपूर जिल्ह्यात दर दिवसाला सहा हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या होत आहेत. मात्र, सोमवारी कोरोना चाचण्यांचा टक्का खाली आला.  दीड ते दोन हजार चाचण्या कमी झाल्या आणि बाधितांचा टक्का वाढला. शहरी भागात दिवसभरात ४ हजार ४७० चाचण्या झाल्या आहेत. तर ग्रामीण भागात केवळ ४६१ अशा एकूण ४ हजार ९३१ आरटीपीसीआर आणि रॅपीड अँटिजेन चाचण्या झाल्या. 

यातही खासगी प्रयोगशाळेत जास्त चाचण्या झाल्या आहेत. १४१७ चाचण्या झाल्या असून, यापैकी २५० जण बाधित आढळले. शासनाकडून चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश असताना चाचण्या कमी होत असल्यामुळे शासकीय प्रयोगशाळांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचे दिसून येते. चाचण्यांसाठी नागरिकच पुढे येत नसल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे.

जिल्ह्यात दिवसभरात नव्याने ६५८ कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८७ हजार २३० वर पोहोचली. आतापर्यंत शहरातील बाधितांची संख्या ६८ हजार ५५२ तर ग्रामीण भागातील १८ हजार १८७ रुग्णसंख्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २८२० मृत्यू झाले आहेत. यापैकी शहरातील मृत्यूंची संख्या २ हजार १२ तर ग्रामीण भागातील संख्या ४९९ झाली. जिल्हाबाहेरील ३०९ मृत्यू नोंदवले आहेत. दरम्यान, १२ दिवसांत एखाद दिवस वगळल्यास इतर दिवशी बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आहे.

७६ हजार लोकांनी केली कोरोनावर मात

सोमवारी शहरी भागातील ६४८ तर ग्रामीण भागातील २४६ अशा एकूण ८९४ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत ७६ हजार ५३८ वर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या पोहोचली आहे. यात शहरातील शहरातील कोरोनामुक्तांची संख्या ६१ हजार ४५ तर ग्रामीणची १५ हजार ४९३ आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तांचे प्रमाण ८७.७४ टक्के आहे.

रेफर रुग्णांमुळे वाढते मृत्यूचा टक्का

सोमवारी दिवसभरात नागपूर जिल्ह्यात ३० कोरोनाबाधित नोंदविले गेले. यात शहरातील ११ तर ग्रामीण भागातील ८ मृत्यू आहेत. विदर्भासह इतर जिल्ह्यातून मेडिकल, मेयोत रेफर करण्यात आलेल्या ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू सोमवारी झाला आहे. यामुळे मृत्यूच्या टक्क्यात काहीसी वाढ झाली आहे. मात्र, दिवसभरात शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ हजार ८७२ वर आली आहे. यात शहरातील ५ हजार १२९, ग्रामीणचे २ हजार ७४३ जणांचा समावेश आहे. 

आजची आकडेवारी

  • दैनिक संशयित-४९३१
  • आजचे कोरोना पॉझिटिव्ह- ६५८
  • आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह- ८७२३०
  • दैनिक कोरोनामुक्त- ८९४
  • आतापर्यंत कोरोनामुक्त- ७६५३८
  • कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण- ७८७२
  • दैनिक तपासणी नमुने- ४९३१
  • आतापर्यंत तपासलेले नमुने-५२३३७१ 


संपादन  : अतुल मांगे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com