esakal | दिपाली वऱ्हाडेने शिक्षणासोबत पेलली गावाची जबाबदारी; वयाच्या २७ व्या वर्षी झाली सरपंच
sakal

बोलून बातमी शोधा

Deepali Varhade Pelli village responsibility along with education

शासकीय योजनांसह लोकसहभागाचा गावाच्या हितासाठी योग्य वापर केल्यास गावात कसे परिवर्तन दिसू शकते याचा प्रत्यय सरपंच दिपाली वऱ्हाडे हिने आणून दिला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून तिने तालुक्यात गावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दिपाली वऱ्हाडेने शिक्षणासोबत पेलली गावाची जबाबदारी; वयाच्या २७ व्या वर्षी झाली सरपंच

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर तालुका... छोटेसे गाव मोहगाव... लोकसंख्या अवघी दोन हजारांच्या घरात... मोहगाव, सावंगी व वाढोडा अशी तीन गावे मिळून मोहगाव येथे गट ग्रामपंचायतीचे कार्यालय आहे. २०१८ मध्ये येथे ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. सरपंचपदाची जागा सर्वसामान्य महिलेसाठी राखीव होती. मोठ-मोठ्यांना पराभवाचा धक्का देत दिपाली वऱ्हाडे ही सरपंच म्हणून विराजमान झाली. तिचे वय अवघे २७ वर्षे...

समाजासाठी आपलेही काही देणे लागते असे दिपालीला वाटत होते. ही भावना तिला शांत बसू देत नव्हती. गावासाठी काही करायचे, गावाचा विकास करायचा हाच विचार तिच्या मनात सतत यायचा. यामुळे तिने निवडणूक लढवण्याचे ठरवले. अशात २०१८ मध्ये गट ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली. विशेष म्हणजे सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार होता. यामुळे तिचा आत्मविश्वास अधिकच वाढला.

अधिक वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

गाव विकासासाठी निवडणुकीचे माध्यमच उचित असल्याने दिपालीने निवडणुकीत उडी घेतली. गावात आधीच मोठ-मोठे राजकीय गट होते. त्यामुळे पराभवाची शक्यता होती. मात्र, आपण कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वत:ला बाधून न घेता गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे तिने ग्रामस्थांना पटवून दिले. ग्रामस्थांनीही तिच्यावर विश्वास दाखवला व एमए, डी. एड असलेली दिपाली भरघोस मताधिक्याने निवडूण आली.

शासकीय योजनांसह लोकसहभागाचा गावाच्या हितासाठी योग्य वापर केल्यास गावात कसे परिवर्तन दिसू शकते याचा प्रत्यय सरपंच दिपाली वऱ्हाडे हिने आणून दिला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून तिने तालुक्यात गावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे शिक्षणासोबत तिने ही जबाबदारी पेलली आहे. पदवीचे शिक्षण घेताना ती सरपंच झाली.

विकासासाठी इतर राजकीय मंडळींना घेतले सोबत

गावाचा विकास करण्यासाठी गावातील इतर राजकीय मंडळींना सोबत घेऊन काम करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम गाव हागणदारीमुक्त केले. ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. गावात जवळपास दोन हजार वृक्षांची लागवड केली. त्यांच्या संरक्षणासाठी लोकवर्गणीतून कठडेही खरेदी केले. आठवड्यातून एकदा ग्रामस्वच्छता, कचऱ्याचे योग नियोजन, लोकवर्गणीतून वाचनालय, व्यायामशाळा तयार केली. गावावर लक्ष रहावे म्हणून ग्रामपंचायत कार्यालयावर सीसीटीव्हीही लावले.

अधिक वाचा - आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी; कॅलेंडरच्या तारखेतून घडला मेळघाटातील पहिला जिल्हाधिकारी

मोहगाव नावारूपाला

गावात पाणीटंचाई असल्याने विहीर खोलीकरणासाठी आमदार निधीतून वेगळा निधी उपलब्ध करून घेतला. गावात नेहमीच जनजागृतीचे कार्यक्रम राबविले. गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अडीच वर्षांत पोलिस स्टेशनमध्ये एकही तक्रार गेली नाही. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम व प्रोत्साहनपर कार्यक्रमांचे आयोजन केले. याचा फायदा होऊन गावात मेरीटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. या सर्व बाबींमुळे तालुक्यात इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करून मोहगाव नावारूपाला आले.

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे

go to top