पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

मिलिंद उमरे
Thursday, 25 February 2021

जवानांनी या परिसरात शोध अभियान राबविले असता पहाडीच्या पूर्व दिशेला १ व पश्चिम दिशेला १ असे दोन इलेक्ट्रिक वायर दिसून आले. या वायरवरून नक्षलवाद्यांची घातपाताची योजना असावी, असा संशय आला.

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोकोटी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले १० किलोग्रॅमचे दोन भूसुरुंग पोलिसांनी नष्ट करीत नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळून लावला. 

मंगळवारी उपविभाग एटापल्लीअंतर्गत येणाऱ्या कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोकोटी जंगल परिसरात गडचिरोलीचे विशेष अभियान पथक, विशेष कृती दल व कोटमी पोलिस मदत केंद्राचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कोकोटी गावाच्या उत्तरेला असलेल्या जंगलातील पहाडी भागात नक्षलवाद्यांनी कॅम्प लावला असल्याची संशयास्पद हालचाल दिसून आली.

अधिक वाचा - आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी; कॅलेंडरच्या तारखेतून घडला मेळघाटातील पहिला जिल्हाधिकारी

पोलिस जवान नक्षलवाद्यांच्या दिशेने आगेकुच करीत असताना जवानांना पाहून जेवण बनविण्याच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांनी प्लॉस्टिक शिट, स्वयंपाकाचे भांडे, भाजीपाला, राशन, पिण्याचे पाणी, चप्पल, जोडे, कपडे, पिट्टू तसेच खुप मोठ्या प्रमाणावर असलेले जीवनावश्यक साहित्य सोडून घनदाट जंगलाच्या दिशेने पळ काढला.

जवानांनी या परिसरात शोध अभियान राबविले असता पहाडीच्या पूर्व दिशेला १ व पश्चिम दिशेला १ असे दोन इलेक्ट्रिक वायर दिसून आले. या वायरवरून नक्षलवाद्यांची घातपाताची योजना असावी, असा संशय आला. त्यामुळे बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून घटनास्थळाची तपासणी केली असता नक्षलवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने १० किलोग्रॅमचे दोन भूसुरूंग जमिनीत पुरून ठेवलेले आढळून आले.

जाणून घ्या - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला

हे भूसुरूंग बाहेर काढणे धोक्याचे असल्यामुळे बीडीडीएस पथकाकडून जागेवरच ते निष्क्रिय करण्यात आले. प्रकरणी या भागात सक्रीय असणाऱ्या कंपनी क्र.४ चा कमांडर प्रभाकर उर्फ रवी उर्फ प्रकाल वीर उर्फ पदकाला स्वामी उर्फ लोकेटी चंदर राव तसेच कसनसूर दलम डिव्हीसीएम व सहकारी नक्षलवाद्यांवर रेगडी पोलिस मदत केंद्रात फिर्याद नोंदवण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police foil Naxal plot to detonate Gadchiroli news