डझनभर रेल्वेगाड्या विलंबाने 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

उशिरा धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रामुख्याने दिल्ली मार्गावरील गाड्यांचा समावेश आहे. उत्तरेकडून येणाऱ्या गाड्या नियोजित स्थळी पोहोचण्यास विलंब होत असल्याने परतीचा प्रवाससुद्धा उशिराच सुरू असल्याचे दिसून येते.

नागपूर : उत्तर भारतातील धुक्‍याची समस्या रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने फारच अडचणीची ठरली आहे. धुक्‍यासोबतच बऱ्याच ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळेही रेल्वेगाड्यांची गती मंदावली आहे. नागपूरमार्गे धावणाऱ्या तब्बल डझनभराहून अधिक रेल्वेगाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा धावत असल्याची नोंद गुरुवारी नागपूर रेल्वेस्थानकावर झाली. रेल्वेगाड्यांच्या लेटलतिफीमुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. 

उशिरा धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रामुख्याने दिल्ली मार्गावरील गाड्यांचा समावेश आहे. उत्तरेकडून येणाऱ्या गाड्या नियोजित स्थळी पोहोचण्यास विलंब होत असल्याने परतीचा प्रवाससुद्धा उशिराच सुरू असल्याचे दिसून येते.

12589 गोरखपूर-सिकंदराबाद एक्‍स्प्रेस सर्वाधिक 6.30 तास, 12724 नवी दिल्ली-हैदराबाद तेलंगणा एक्‍स्प्रेस 5.30 तास, 12616 नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्‍स्प्रेस 4 तास, 22692 हजरत निजामुद्दीन - बेंगळुरू राजधानी एक्‍स्प्रेस 3.30 तास, 12722 नवी दिल्ली - हैदराबाद दक्षिण एक्‍स्प्रेस 3.30 तास, 1 2410 हजरत निजामुद्दीन- रायगढ गोंडवाना एक्‍स्प्रेस 3 तास, 07010 बरौनी-सिकंदराबाद स्पेशल ट्रेन 3 तास, 12622 नवी दिल्ली -चेन्नई तमिळनाडू एक्‍स्प्रेस 3 तास, 22430 पॉंडेचरी-नवी दिल्ली एक्‍स्प्रेस 2 तास, 12708 हजरत निजामुद्दीन-तिरुपती एपी संपर्कक्रांती एक्‍स्प्रेस दीड तास, 12834 हावडा -अहमदाबाद एक्‍स्प्रेस दीड तास, 12669 चेन्नई- छपरा गंगाकावेरी एक्‍स्प्रेस व 182143 बिलासपूर-भगतकी कोटी एक्‍स्प्रेस प्रत्येकी 1 तास उशिरा धावत होती.

रेल्वेगाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. रेल्वेस्थानकावरील प्रतीक्षालये आणि फलाटांवर गर्दी वाढली आहे. रात्रीच्यावेळी येणाऱ्या गाडीच्या प्रवाशांना कुडकुडत वेळ काढावी लागत आहे. 

हेही वाचा - तुम्ही बेरोजगार आहात? सावध राहा

पंधरवड्यात 15 हजारांवर फुकट्यांना चाप

 मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे संपूर्ण विभागात विशेष तिकीट तपासणी पंधरवडा राबविण्यात आला. यात एकूण 15 हजार 719 फुकट्यांची धरपकड करीत त्यांच्याकडून 43.21 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे 1 ते 18 डिसेंबरदरम्यान विभागातील 24 रेल्वेस्थानकांवर मोहीम राबविण्यात आली. या काळात विनातिकीट प्रवास करणारे, अनियमित डब्यातून प्रवास करणारे आणि नोंदणीशिवाय मालवाहतूक करणाऱ्या एकूण 3 हजार 413 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 16 लाख 66 हजार 850 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय नागपूर आणि अजनी स्टेशनवर मॅजिस्ट्रेट तपासणी अभियान राबविण्यात आले. त्यात 40 जणांची धरपकड करण्यात आली. संबंधितांकडून 17 हजार 260 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delayed dozens of trains