तुम्ही बेरोजगार आहात? सावध राहा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

आरोपीला नागपुरे यांची आर्थिकस्थिती चांगली वाटत असल्यामुळे त्याने वेळोवेळी भेटून व आरटीजीएस व नगदी 12 लाख 60 हजार रुपये घेतले. अशाप्रकारे नागपुरे यांच्याकडून एकूण 13 लाख 60 हजार रुपये घेतले. पैशाचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर नागपुरे यांनी नोकरीसंदर्भात आरोपींना कॉल करून विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळ सुरू केली. 

नागपूर : देशात मंदी चांगलीच वाढली आहे. सर्वीकडे बेरोजगारी दिसून येत आहे. शासकीय नोकऱ्या निघत नाही आहे. खासगी कंपन्यांमध्येही कामगारांची संख्या कमी करण्यात येत आहे. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. एकीकडे महागाई तर दुसरीकडे बेरोजगारी असल्याने काय करावे, असा प्रश्‍न पडत आहे. उच्चशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून जाळ्यात ओढून लाखोंनी लुबाडणूक करणाऱ्या बऱ्याच टोळ्या नागपुरात कार्यरत आहेत.

अशाच एका टोळीने गोंदियाच्या दोन बेरोजगार भावंडांना नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 13 लाख 60 हजारांनी गंडा घातला. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी तक्रारीवरून टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आशीष महाजन, रूपेश, सौरभ, प्रशांत व बंटी मेडके अशी आरोपींची नावे आहेत. 

अधिक वाचा -  काम नाही, धाम नाही तरीही वाजवारेऽऽ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूतनलाल चमरूलाल नागपुरे (53, रा. कावरा, भादा, जि. गोंदिया) यांची मुले अनिल व सुनील दोघे उच्चशिक्षित असून, नोकरीच्या शोधात होते. गावातील मुलगा सिन्नू याने नागपुरे यांना नागपूरमध्ये चार युवक सरकारी नोकरी लावून देण्यासाठी सेटिंगची काम करतात, अशी माहिती दिली. त्यानुसार, नागपुरे यांच्या सांगण्यावरून सिन्नू याने आरोपी आशीष महाजन नावाच्या व्यक्तीला फोन लावला आणि दोन जणांना नोकरी लावायची असल्याचे सांगितले. 

आरोपीने नागपुरेला दोन्ही मुलांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले आणि स्वत:ची बांजगी इंटरनॅशनल प्रा. लि. नावाची कंपनी असून, तेथील मोठ्या अधिकाऱ्याशी चांगली ओळख असल्याचे सांगितले. आरोपीच्या सांगण्यावर नागपुरे यांनी लगेच विश्‍वास ठेवून 24 डिसेंबरला नागपूरला आल्यानंतर गणेशपेठ हद्दीतील शेतकरी भवनसमोरील गणेशपेठ बसस्टॉप येथे भेटून एक लाख रुपये दिले. 

क्लिक करा - आला 'हिवसाळा', स्वेटर जॅकेटसह रेनकोटा घाला

आरोपीला नागपुरे यांची आर्थिकस्थिती चांगली वाटत असल्यामुळे त्याने वेळोवेळी भेटून व आरटीजीएस व नगदी 12 लाख 60 हजार रुपये घेतले. अशाप्रकारे या प्रकरणात आरोपी आशीष महाजन, रूपेश, सौरभ, प्रशांत, बंटी मेडके या पाच जणांनी संगणमत करून नागपुरे यांच्याकडून एकूण 13 लाख 60 हजार रुपये घेतले. पैशाचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर नागपुरे यांनी नोकरीसंदर्भात आरोपींना कॉल करून विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळ सुरू केली. आरोपींनी आपला विश्‍वासघात करून फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर नागपुरे यांनी गणेशपेठ पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of unemployed siblings in Nagpur