भाजपच्या एका गटाला झोंबला नागपूरचा पराभव मात्र दुसऱ्या गटाला फुटल्या आनंदाच्या उकळ्या; अजित पवारांचा टोला 

टीम ई सकाळ 
Tuesday, 15 December 2020

विधानसभेचं हिवाळी अधिवेशन यावेळी नागपूरला न होता मुंबईला पार पडलं. अवघ्या दोन दिवसांच्या या अधिवेशनात सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडी आणि विरोधीपक्ष भाजपनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं.

नागपूर ः विधानसभेचं हिवाळी अधिवेशन यावेळी नागपूरला न होता मुंबईला पार पडलं. अवघ्या दोन दिवसांच्या या अधिवेशनात सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडी आणि विरोधीपक्ष भाजपनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं.

तीन वेगवेगळ्या पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवलं. त्यामुळे यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. त्याचं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. सरकार आता पडेल, उद्या पडेल, याची वाट बघता बघता विधानपरिषद निवडणुका आल्या आणि नागपूरचा ५६ वर्षांपासूनचा गड हातचा गेला. विशेषकरून पदवीधर मतदारांनी यांचा पराभव केला, तोच भाजपवाल्यांच्या नाकाला झोंबला, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत तुफान फटकेबाजी केली.

नक्की वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज

पुरवणी प्रश्‍नांच्या उत्तरात अजित पवार बोलत असताना विरोधी बाकांवरील सदस्य मध्येमध्ये बोलत होते. त्यानंतर त्यांनी विधानपरिषद निवडणूक निकालाचे दाखले देत विरोधकांना चांगलेच टोले हाणले. ते म्हणाले, सहा महिने गेले, एक वर्ष गेलं. सरकार आता पडेल, मग पडेल, याची वाट विरोधी पक्षाचे नेते बघत होते. पण मध्येच विधानपरिषद निवडणूक आली आणि निकालांनी भाजपचे नेते कोमात गेले. या निकालाने एक गट कमालीचा दुखावला असला तरी दुसऱ्या गटात मात्र आनंदाच्या उकळ्या अजूनही फुटत आहेत, असे म्हणताच सत्ताधाऱ्यांनी मोठ्याने बाकडे वाजवून अजितदादांचा उत्साह वाढवला.

पुण्याचं प्रतिनिधित्व चंद्रकांत पाटलांनी केलं. यावेळी आम्ही बंडखोरी होऊ दिली नाही. त्यामुळे तेथेही पहिल्याच फेरीत भाजपला पराभवाचे तोंड बघावे लागले. तीच गोष्ट औरंगाबादेत सतीश चव्हाण यांच्याबाबत घडली. नंदुरबारची जागा त्यांची आली. पण ती सुद्धा आमचेच अमरीश पटेल त्यांनी घेतले म्हणून. पण काळजी नाही, ते सुदधा आमच्याकडे येतील आणि राहिलेली कमी भरून काढतील.

अमरावतीला आमचं थोडं चुकलं. तेथे आमचा उमेदवार निवडून आला नाही, अपक्षाने बाजी मारली. पण त्यातही आनंद म्हणजे तेथेही भाजपचा उमेदवार निवडून आला नाही. हे सांगताना पवार यांनी विशिष्ट हातवारे केले. त्यामुळे सभागृहात हंशा पिकला.

हेही वाचा - अंकिता जळीतकांड : पहिल्याच दिवशी आरोपीचे वकील गैरहजर; गुरुवारी देतील आरोपावर उत्तर

शिक्षक आणि पदवीधर मतदार हे हुशार आहेत. जग पाहिलेला आणि अभ्यासू हा वर्ग आहे. या लोकांनी ताकदीने आम्हाला निवडून दिले. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे भविष्य काय असेल, याचा अंदाज आताच आलेला आहे, असेही अजित पवार म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit pawar criticized BJP over elections results