sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis says The whole month is dangerous for the people of Nagpur

खासगी संस्थांसोबत मिळून असे काही कोविड केअर सेंटर तयार करावे लागतील की, जेथे आॅक्सीजन पुरवठा करणाऱ्या खाटा असल्या पाहिजेत. सध्या जे कोविड रुग्णालय नाहीत, त्यांनाही या व्यवस्थेमध्ये प्रशासनाने जोडून घ्यावे. जेणेकरून मनुष्यबळाचा प्रश्‍नही निकाली निघेल.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचवला कोविड नियंत्रणासाठी उपाय, वाचा काय म्हणाले ते...

sakal_logo
By
अतुल मेहेरे

नागपूर : सुरुवातीला नियंत्रणात असलेला कोरोना या महिन्यात हाताबाहेर जाताना दिसत आहे. या महिन्यात मृत्यूदर झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे रुग्णांची चाचणी करण्याचे प्रमाण आता वाढवले पाहिजे. सद्यःस्थितीत जवळपास तीन हजार चाचण्या होतात. ही संख्या आता पाच हजारांच्यावर नेण्याची गरज आहे. येणारा महिनाभराचा काळ नागपूरकरांसाठी धोक्याचा आहे, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोरोनाच्या स्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते नागपुरात आले. महानगरपालिकेत महापौर, आयुक्त, इतर अधिकारी आणि काही आमदारांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बाधितांची संख्याही गेल्या १५ दिवसांत प्रचंड वाढली आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवल्यानंतर बाधितांची संख्याही वाढेल. या वाढलेल्या रुग्णांचे व्यवस्थापनदेखील योग्य प्रकारे करण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. यातील लक्षणे नसलेले रुग्ण गृह विलगीकरणात जाऊ शकतील. तरीही कोविड केअर सेंटरमध्ये व्यवस्था वाढवण्याची आवश्यकता आहे.

अधिक माहितीसाठी -  ‘तू प्रेमविवाह केला ना, मग पतीला का सोडले?' वडिलांनी हा प्रश्न विचारताच मुलगी चिडली अन्...

खासगी संस्थांसोबत मिळून असे काही कोविड केअर सेंटर तयार करावे लागतील की, जेथे आॅक्सीजन पुरवठा करणाऱ्या खाटा असल्या पाहिजेत. सध्या जे कोविड रुग्णालय नाहीत, त्यांनाही या व्यवस्थेमध्ये प्रशासनाने जोडून घ्यावे. जेणेकरून मनुष्यबळाचा प्रश्‍नही निकाली निघेल. असे केल्यास येत्या २० ते २५ दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर आटोक्यात येऊ शकेल, असे फडणवीस म्हणाले.

गृहविलगीकरणातही करावे समुपदेशन

लक्षणे नसलेले रुग्ण गृहविलगीकरणात राहू शकतील. अशा रुग्णांना उपचारांची तेवढी आवश्यकता नाही, जेवढी समुपदेशनाची आहे. खासगी डॉक्टरांची यामध्ये मदत घेता येऊ शकेल. मोबाईल फोनवर व्हिडिओ कॉल करून दररोज दोन ते तीन तास रुग्णांचे समुपदेशन खासगी डॉक्टर करू शकतात, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - राज्यातील हजारो शिक्षकांना कसा मिळणार दिलासा ?...वाचा सविस्तर

लहान-लहान केंद्र उभारावे

राज्याचा आणि एकंदरीतच देशाचा आढावा घेतला असता एक गोष्ट लक्षात आली की, कोरोना रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी जम्बो कोविड केअर सेंटर फारसे प्रभावी ठरत नाही. त्यापेक्षा लहान-लहान कोविड सेंटर उभारावे. यामध्ये रुग्णांचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने केले जाऊ शकते. या पद्धतीची व्यवस्था नागपुरात उभारावी, अशा सूचना प्रशासनाला केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

दिल्लीत प्रादुर्भाव २४ वरून ५ टक्क्यांवर आला

नागपूरच्या तुलनेत मुंबईमध्ये चाचण्यांची संख्या कमीच आहे. नागपूरची लोकसंख्या २५ लाख आहे आणि मुंबईची दोन कोटी. नागपुरात तीन हजार चाचण्या होतात, तर मुंबईमध्ये पाच ते साडेपाच हजार होतात. त्यामुळे मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे मागेच मी बोललो आहे. दिल्लीमध्ये चाचण्यांची संख्या पाच हजारांवरून २८ हजारापर्यंत नेली आणि रुग्णाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले. त्यामुळे तेथील प्रादुर्भाव २४ टक्के होता, तो पाच टक्क्यांवर आला. त्यामुळे आपल्यालाही तेच करावे लागणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

go to top