राज्याच्या पोलिस महासंचालकांचं आहे नागपूरसोबत विशेष नातं; पटवर्धन शाळेत आणि व्हीनआयटीमध्ये झालं संपूर्ण शिक्षण 

अथर्व महांकाळ 
Friday, 8 January 2021

पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांचे मूळ गाव चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती असून तेथूनच त्यांचे जिल्हा परीषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते नागपुरात आले.

नागपूर ः राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून सूत्रे सांभाळणारे हेमंत नगराळे यांचे विद्यार्थी जीवन नागपुरात गेले आहे. नगराळे यांनी नागपुरातील पटवर्धन शाळेत माध्यमिक शिक्षण घेतले असून नागपुरातील व्हीएनआयटी कॉलेजमधून अभियांकत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे नागपुरात शिक्षण घेतलेला तरूण आज पोलिस महासंचालक पदावर विराजमान असल्यामुळे नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. 

पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांचे मूळ गाव चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती असून तेथूनच त्यांचे जिल्हा परीषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते नागपुरात आले. त्यांनी सीताबर्डीतील पटवर्धन माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला होता. त्यानंतर त्यांनी १९८४ मध्ये तत्कालिन व्हीआरसीई म्हणजे आताची व्हीएनआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. (मॅकेनिक) ला प्रवेश घेतला होता. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी वकृत्वाची छाप सोडली होती. 

जाणून घ्या -  'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं 

कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजन समितीमध्ये हेमंत यांचा सहभाग असायचा. त्यांना कॉलेजमधील छोट्या-मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी करण्याची जबाबदारी असायची, असे त्यांचे वर्गमित्र सांगतात. सध्या ते व्हीएनआयटी कॉलेजच्या ॲल्युमिनी असोसिएशनचे सक्रीय सदस्य आहेत. त्यामुळे अजुनही नागपूर भेटीला आले की महाविद्यालयाला भेट देतात. यासोबतच ॲल्युमिनी असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमात आणि उपक्रमात शक्य तेवढी मदत करीत असतात, अशी प्रतिक्रिया त्यांच्या वर्गमित्रांनी दिली. 

माध्यमिक शाळेत असताना त्यांना खेळाची विशेष आवड होती. त्यांनी ज्युडो कराटे आणि टेनिस खेळ आवडत होते. ते ज्युडोमध्ये ब्लॅक बेल्ट होल्डर आहेत. आंतरशालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर आयोजित स्पर्धेत त्यांनी क्रीडा स्पर्धा गाजविल्या आहेत. ज्‍युडोसह ते बास्केटबॉल आणि व्हॉलीबाल या खेळातही ते रस घेत होते. सध्या ते गोल्फ या खेळून आपले क्रीडाप्रेम जोपासतात. हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या नावावर मोठमोठे तपास यशस्वी केल्याची छाप आहे. 

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू

सध्या त्यांच्याकडे कायदे व तांत्रिक विभागाची पोलिस महासंचालक म्हणून जबाबदारी आहे. सुबोध कुमार जयस्वाल यांची सीआयएसएफमध्ये नियुक्ती झाल्याने हेमंत नगराळे यांच्या नावाची चर्चा होती. शेवटी अनेक दिग्गज असताना हेमंत नगराळे यांच्याकडे महासंचालक पदाची धुरा देण्यात आली. ते जवळपास १९ महिने महासंचालक पदावर राज्याची सेवा करणार आहेत. नगराळे यांना राष्ट्रपती पदक, विषेश सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director General of Police ऑफ Maharashtra has connection with Nagpur